सप्तरंगी साहित्य मंडळासह विविध संघटनांनी केला सत्कार ; शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाल्याचे कोकुलवार यांचे मत
नांदेड –
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मंडळाचे महासचिव पांडूरंग कोकुलवार यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मानाची शाल, पुष्पहार, बुके व ग्रंथभेट हे या सत्काराचे स्वरुप होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, राज्य समन्वयक तथा हिंगोली प्रभारी बाबुराव पाईकराव यांची उपस्थिती होती.
आपल्या २५ वर्षांच्या शैक्षणिक कालखंडात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अभियान, शैक्षणिक साहित्य निर्मिती,स्काऊट गाईड, राष्ट्रीय कार्यात सहभाग, शैक्षणिक युट्युब व्हिडीओ निर्मिती, शैक्षणिक शाॅर्टफिल्म भाता निर्मिती, शिक्षणविषयक काव्यनिर्मिती, पोलीओ मोहीम सहभाग, जनगणना पर्यवेक्षण सहभाग, शिक्षक विद्यार्थी पालक समन्वय साधून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण, आॅफलाईन पद्धतीने शिक्षण आदी उपक्रम यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेकडून त्यांना हिमायतनगर तालुक्यातून जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकुलवार हे हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकंबा येथील प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर आहेत.
पद्मांकुर सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागभूषण दुर्गम, मनोहरराव संगमवार साहेब, काशीनाथ सिरसुलवार साहेब, संतोष गुंडेटवार, गणेश भुसा यांनी त्यांचा हृद्य सत्कार केला. तसेच सयाई प्रतिष्ठन हिंगोलीचे नरेंद्र धोंगडे यांनी तर मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरीतर्फे नागोराव डोंगरे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय धात्रक, बोरगडी तांडाचे सहशिक्षक गोविंद दासरवार यांनीही कोकुलवार यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देतांना पंचवीस वर्षांच्या कालखंडात अध्ययन अध्यापनाच्या शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाला असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुरत्न वाघमारे हे होते. तर मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, रुपाली वैद्य वागरे यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या छोटेखानी सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन गंगाधर ढवळे यांनी केले. प्रास्ताविक कैलास धुतराज यांनी तर आभार बाबुराव पाईकराव यांनी मानले.