माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस सहकार्य करा ;गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन!

#मुंबई_दि. 8

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.



या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिली.
ही मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे आणि महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जनजागृती मोहीम
आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती आणि विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करून घेण्यासाठी, निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचे संकट लवकर जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. यापुढेही आपल्याला अधीक दक्षता घ्यावी लागेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना बाबत जनजागृतीच्या ज्या-ज्या सुचना केल्या, त्या सुचनांचे पालन करण्यात येत आहे. असे सांगून अधिवेशन शांततेत पार पडले. या अधिवेशनात आरोग्याचे नियम पाळण्यात आले. विधानसभेतील सर्व सदस्यांनी सहकार्य केले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.
राज्यात मार्चमध्ये केवळ तीन प्रयोगशाळा होत्या मात्र, कोविड संकट वाढत असल्याने, आता जवळपास पाचशे तीस प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. मुंबईबरोबरच राज्यात आरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी उभ्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर राज्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच पर्याय आहे. जनतेला त्यांचे हित कशात आहे, हे नीटपणे सांगणे आणि जनजागृती करणे  गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अर्थचक्राला गती देण्यासाठी प्रयत्न
अर्थचक्र पुढे चालू राहण्यासाठी उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहेत. तसेच, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कोविड काळात सुद्धा या योजनेची अंमलबजावणी सुरूच ठेवण्यात आली. जवळपास साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले. तसेच, साडे सहा लाख आदिवासी बालकांना आणि महिलांना मोफत दुध भुकटी देण्यात येणार आहे.
धनसंपत्ती बरोबर वनसंपत्ती महत्त्वाची
आपल्याकडे धनसंपत्ती,  जनसंपत्ती आहे, तशीच आपल्याकडे वनसंपत्ती आहे. आरेमधील सहाशे एकर जमीन आपण जंगलासाठी राखीव ठेवत आहोत. संपूर्ण जगात कुठेही नाही, असे हे मुंबई महानगराच्या मध्यभागी असलले जंगलाचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. याठिकाणी वन्यजीव देखील आहेत, त्यांचा हा निवारा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. वन्यजीव असलेली ही देशातील एकमेव वनसंपत्ती आपल्याकडे आहे. मुंबईसाठी इतर सोयी सुविधा देत असताना, मुंबईच्या पर्यावरणासाठी सहजीवनासाठी ही संपदा जोपासणे आवश्यक असल्याचेही  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *