आजारावर मात करण्यासाठी बोळकावासीयांची एकजूट; ओमकार कांबळेच्या उपचारासाठी केली आर्थिक मदत-

कुरुळा:  वठ्ठल चिवडे

आपण समाजाच्या जडणघडणीत महत्वाचे आणि अविभाज्य घटक आहोत.समाजातील दुःखी,वंचित कुटुंबाचे काही देने लागतो या उदात्त भावनेपोटी बोळका येथील गावकऱ्यांनी ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराशी झगडणाऱ्या विद्यार्थीदशेतील ओमकार कांबळेच्या उपचारासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे.या कृत्यातून बोळकावासीयांच्या एकजुटीचे दर्शन होते.


कुरुळा येथून पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या बोळका या लहानश्या गावातील ओमकार संजय कांबळे वय वर्ष १६ हा विद्यार्थी गावातील राजीव गांधी विद्यालयात दहाव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे.मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ओमकार ला ताप येत होता तो कमी होत नसल्याने औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यात ल्यूकेमिया ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले.

संजय कांबळे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून चरितार्थासाठी ते स्वतः सालगडी म्हणून कामाला आहेत.कुटुंबातील स्वतःची पत्नी मोठा मुलगा व त्याची पत्नी दिवसभर मोलमजुरी करून जेमतेम जगण्याइतपथ अर्थार्जन होते.अश्या परिस्थितीत उपचारासाठी लाखो रुपये कसे जमवणार हा यक्षप्रश्न कांबळे कुटुंबासमोर होता.

अशावेळी बोळका येथील स्व.राजीव गांधी विद्यालय येथील मु.अ. मारोती तुपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरवातीला ११ हजार रुपयांची मदत जाहीर केली व इतर माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले.त्यास प्रतिसाद देत शाळेचे माजी विद्यार्थी व गावकऱ्यांनी केवळ दोन दिवसात ८६६०० रुपयांची लोकवर्गणी ६ सप्टेंबर रोजी मंदिरात जमा केली.ही रक्कम ओमकार कांबळे च्या उपचारासाठी पाठवण्यात आली असून त्याच्यावर मुंबई परेल येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याचे गावकऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

या उपचारासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यासाठी बराच खर्च येणार आहे.यासाठी विविध सामाजिक संघटना,राजकीय पुढारी यांनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे असे समस्त बोळकावासीयांच्या वतीने सकाळच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *