राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन पदकांची मानकरी… सुवर्ण व रौप्य पदकावर कोरले महाराष्ट्राचे नाव

 

नांदेड-दि.१५ गोवा येथे नुकत्याच झालेल्या २२ व्या राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत नांदेडची भुमिकन्या, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिने दोन पदकांवर महाराष्ट्राचे नाव कोरले आहे.
दि.९ जानेवारी ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत गोवा येथे झालेल्या २२ व्या नॅशनल पॅरा अथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांनी गोळाफेक मध्ये सुवर्ण पदक पटकाविले व भालाफेक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवून महाराष्ट्राची शान कायम राखली आहे.

नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिने दिव्यांग यांच्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट केली आहे.

दुबई येथे झालेल्या फाजा व चीन येथे झालेली ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा,
बंगळूरू येथे ऑगस्ट 2022 मध्ये झालेली चौथी इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धा,
नोव्हेंबर 2022 मध्ये पोर्तुगाल येथे जागतिकस्तरावर झालेली आयवॉज २०२२ जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धा,
मार्च 2023 मध्ये उत्तर आफ्रिकेतील मोरक्को या देशात झालेली वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स २०२३ स्पर्धा,
बंगळूरु येथे झालेली पाचवी भारतीय ओपन पॅरा अथेलिटिक्स इंटर नॅशनल चॅम्पिअनशीप-2023,
पॅरिस येथे झालेली वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धा,
नोव्हेंबर-२०२३ मध्ये चीन येथे झालेली एशियन पॅरा गेम्स-२०२३ आदी स्पर्धांमध्ये तिने भारताचे प्रतिनिधीत्व करून पदकांची लयलूट केली आहे.
सन २०२१ मध्ये जपान मधील टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देखील तिने चमकदार कामगिरी केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया या स्पर्धेत तिने दोन सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले होते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे त्याच बरोबर देशाचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्रासह देशाची शान कायम राखली आहे.
भाग्यश्री जाधव हिने प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण (बंगळूरु), प्रशिक्षक श्रीमती पुष्पा (बंगळूरु), सहाय्यक प्रशिक्षक रविंदर सर, स्ट्रेन्थ व कंडिशनिंग प्रशिक्षक मयुर रसाळ व गुरुबंधु पालक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. गोव्यातील स्पर्धेसाठी भाग्यश्रीची मैत्रिण कु.सविता पतंगे यांचे सहकार्य लाभले.या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

माझ्या या यशात मला वेळोवेळी सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मोफत वैद्यकीय उपचार करणारी डॉक्टर मंडळी व माध्यम जगतातील सर्व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया भाग्यश्री जाधव हिने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *