व्वा ताज!

अंतर्मनाच कितीही वाळवंट झालेलं असलं तरी त्या प्रतिकृतीकडे पाहून मन पुन्हा ताजे टवटवीत व्हायला लागते. 
त्यांच्या प्रेमाचे प्रत्यक्षात साक्षीदार होता नाही आले परंतु ,
 येथील स्मारकात त्यांच्या रमणीय सौंदर्यपूर्ण अर्थवलये विस्तारलेली आपल्याला दिसेल हेच ह्यांच्या प्रेमाचे सामर्थ्य दर्शविणारा वास्तूला भेटू देऊन काही तरी लिहीण्याची ईच्छा उफाळून आली.
समग्र मानवी संस्कृती यांच्या प्रेमाला दोन हातांनी कुरवाळताना दिसते. 
अशी भव्यदिव्य वास्तू म्हणजे ‘ताजमहाल’.
दिल्ली येथे फिरायला जाणं आणि ताजमहाल पाहिला न जाणं हे मनाला पटत नव्हतं म्हणून पुष्कळश्या बकेट लिस्टमधिल किंवा विशलिस्ट यादीतील एक विश म्हणजे ताजमहाल पाहिला जाणं होय. दिल्लीला जाण्यासाठी मग तसं अवचित ही मिळालं आणि सोबती ही मिळाली मग काय? निघाली दिल्ली ट्रिप… दिल्लीतील भरपूर  ठिकाणे पाहिली जसे की, कुतूब मिनार, इंडिया गेट, राजघाट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लाल किल्ला, लाल बहादूर शास्त्री यांचे निवासस्थान, हुमायु का मकबरा, अक्षरधाम मंदिर… विविध बाजारपेठ, असं बरंच काही…पण ताजमहाल पाहायला जाण्याची ओढ, उत्सुकता काही वेगळीच होती… दिवस ठरल्याप्रमाणे 12 डिसेंबर रोजी म्हणजेच माझ्या जन्मदिनी तिथे जाण्याचे ठरवले.
धुक्याने दिल्ली या शहराला आपल्या कवेत घेतलेलं असतानाच 
पहाटे लवकर उठून सर्व आवरून गाडी ठरवून आम्ही आग्राकडे रवाना झालो… जाण्यापूर्वी या वास्तूबद्दल मी लहानपणापासून जे जे काही वाचले,ऐकले त्यामुळे मनात एक कुतुहल आणि ओढ निर्माण झाले होती. याच बरोबर इंटरनेट वर मिळाले ते वाचून काढले. यामुळे या वास्तूबद्दल किती प्रकारचे तर्क वितर्क आहेत याची ही मला जाणीव झाली.
4 तासाचा प्रवास करून आग्र्याला पोहचलो तेव्हा स्वच्छ आणि सुंदर असं हे शहर दिसलं. देश-विदेशी लोकांची रेलचेल दिसली सुंदर सुंदर कलाकुसरी दिसल्या. काही क्षणात आता मी ताज समोर जाणार हा बालिश उत्साह तळमळू लागला. पुढे चालत चालत असं वाटतं होतं की, ताजला पाहून घट मिठीच मारत की काय? तिकीटे काढली, रितसर संरक्षण यंत्राखाली पाहणी झाली. खाण्या पिण्याच्या वस्तू आत नेण्याला बंदी होती. म्हणून खाऊन आत जा असं सांगण्यात येतं होतं.
जसं जसं आत जात होते तसे तसे काळजाचे ठोके वाटत होते.
एखादीची आले तिथे, जिथे येण्यासाठी नको ते मनात धागेदोरे विनले होते…ताजला पाहताच क्षणी एक उसासा घेत तोंडून निघालं ‘व्वा ताज!’…
संपूर्ण ताजमहालाची कृती डोळ्यात भरून …क्षण भर डोळे मिटले… आणि उघडले…हे खरं का खोटं याची प्रचिती येण्याची  ही कृती असावी बहुतेक… एखाद्या नी चिमटा काढावा असा…
मग काय? ताज ला विचारावसं वाटलं….
मुद्दतों बाद मिले है, आज अपनी सुनाओ कैसे हो
वो भूली दास्ताँ की कहानी, सुनाओ फिर से
महले ए जहाँ से कई फ़साने सुने है तेरे हम ने,
नयी कहानी अपनी जुबानी, सुनाओ फिर से….
ताज ने कहाॅं…
खामोशी की गुफ़्तगू, क्या सुनोगे दास्ताँ हमारी,
कोई इश्क़ ना करे किसीसे, होती है परेशानी,
क्या सुन पाओगे ये किस्सा,मेरी जुबानी 
ताज ने ही आश्याच प्रितीक्रियात व्यक्त होण्याचा काही भार उचलला की काय जणू असं वाटतं होतं…. काय? करणार कवी मन आहे काही ही डोक्यात येऊ शकते! 
‘ताजमहाल’ हि एक अभूतपूर्व कृती जी की प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. तो पाहताना नेमका कोणता मोह आवरावा हे कळतं नव्हतं.’ताजमहाल ‘ हे एक प्रेमाचे प्रतीक आणि मूलत: एक समाधी स्थळ आहे. हेच स्थळ एक सौंदर्याचे प्रतीक देखील आहे. जगाच्या नवीन सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते यात आश्चर्य नाही. ही एक मोगल इमारत जी पूर्णपणे संगमरवरी, रत्ने, मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान दगडांनी जडवलेली आहे.  ‘ताजमहाल’ भारतातील  एक प्रतिष्ठित ऐतिहासिक वास्तू  आणि  स्मारक आहे.  ताजमहाल मोगल सम्राटांपैकी एक महान शाहजहान याने त्याची पार्शियन पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधला होता. ‘ताजमहाल’  हे  भारतातील तसेच जगातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ झाले आहे. दरवर्षी या स्मारकाला जगभरातून लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. ताजमहाल ला 1983 मध्ये  युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला गेला आहे. हे सर्वज्ञात आहे. पण ताज प्रत्यक्ष पाहिल्यावर कळालं की, वास्तुकलेचा एक विलक्षण शिल्प म्हणजे ‘ताजमहाल’ आज चारशे वर्षांपासून ही वास्तू आद्यावावत आहे हेच खरे अद्भुत आश्चर्य आहे. शहाजहान बादशहाने आपल्या आवडत्या मुमताज बेगम साठी हा नजराणा भेट द्यायचा होता म्हणून बांधकाम केले परंतु तसे झाले नाही, बेगम वारल्या या बेगमची कब्र तेथे अंतर्भूत केली गेली. याचबरोबर शेजारीच काही काळानंतर शहाजहानची कब्र ही तेथे स्थापन केली गेली.
ताजमहाल हा मुघल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची आर्किटेक्चरल शैली पार्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी संमिश्रता आहे, त्याच नयनरम्य दृश्य पाहून स्वतःला खरचं एक विलक्षण कृती पाहण्याचा आनंद मिळाला.
मध्य स्थानी बनलेला मकबरा स्वतःच्या वास्तुश्रेष्ठतेच्या सौंदर्याचा परिचय देतो. ताजमहालचा केंद्रबिंदू म्हणजे मकबरा. ज्यामध्ये एक अतिविशाल वक्राकार प्रवेशद्वार आहे. या इमारतीच्या वरती एक घुमट बांधण्यात आला आहे. बाकीच्या इमारतींसारखे याचे बांधकाम मुघल शैलीचे आहे असे म्हणतात. याचा मूळ आधार एक विशाल बहु-कक्षीय संरचना आहे.  याच्या अशा प्रकारच्या संरचनेमुळे तुम्ही कोणत्याही बाजूने ताजमहाल बघितल्यास तो सारखाच भासतो. याच्या चारही बाजूच्या चार कोपरयांमध्ये मनोरे उभारलेले आहेत. असं म्हणतात की, ताज महालाचा मुख्य मकबरा दिवसामध्ये अनेक वेळा आपला रंग बदलतो. जो मुमताज महल च्या स्वभावाचे प्रतिक मानले जाते.
ताजमहालाच्या निर्मितीचे काम तत्कालीन प्रख्यात वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहौरी यांच्या देखरेखीखाली झाली.
 वेळो-वेळी शत्रूच्या संभावित हल्ल्यापासून वाचण्यासाठी ताजमहाल ला अनेक वेळा लाकूडे व कापड वापरून झाकण्यात आले होते.
असे म्हटले जाते की, ताज महालाच्या निर्मिती नंतर शाहजहान ने सर्व कारागिरांचे हात तोडून टाकले होते. जेणेकरून ताज महालासारखी दुसरी कलाकृती तयार होऊ नये म्हणून, परंतु असं ही ऐकण्यास मिळाले की, ‘हुमायु का मकबरा’ हा ताजमहाल च्या आधी बांधण्यात आला होता. शहाजहानला ती प्रतिकृती ईतकी आवडली की, त्यांनी तिचं प्रतिकृती संगमरवरी या दगडांनी बनवली त्यांनी जसी नकल्ल केली तशीच नकल्ल कोणी ही करू नये म्हणून त्यांनी सर्व कारागिरांचे हात तोडून टाकले होते.
असेच काही समज किंवा गैरसमज या ताजमहाल शी जुळल्या गेल्या आहेत.
काही संदर्भांनुसार ही राजा मानसिंगची हवेली होती आणि ती शहाजहानने त्याच्याकडून रीतसर व्यवहार करून घेतली. म्हणजे हा रोकठोक व्यवहार झाला. जसे आपण कुणाचे घर घेतो आणि मग रिनोव्हेशन करून ते बदलतो तसाच आजचा ताज अस्तित्वात आला आहे असे म्हणतात. तर काही जण म्हणतात की शहाजहानने ताजमहाल बांधण्याच्या आधी तिकडे मंदिर,शंकराची पिंड वगैरे होती आणि ती पाडून त्याने तिकडे ताजमहाल बांधला याबाबतीत एकही समकालीन संदर्भ मिळत नाही. परंतु खरं काय आणि खोटे काय माहित नाही. पण
ताजमहाल हि जगामधील सर्वोत्कृष्ट मानवनिर्मित कलाकृती म्हणून गौरवला गेला हे मात्र खरं आहे. ताज हा अप्रतिम सुंदर आहे ह्यात काहीच वाद नाही. त्याच्या अवती भोवती चार बाग म्हणजे पाण्याचे कालवे, कारंजी, सभोवतालची बाग हे अगदी खास इस्लामी स्थापत्यातले नमुने आहेत. आणि आजच्या काळात कुणी जर अशी वास्तू उभारायची म्हटली तर त्याला किती खर्च आणि कौशल्य लागेल याची कल्पनाच करवत नाही. ही वास्तू आपली ओळख आहे. फक्त ह्या वस्तूला पाहायला म्हणून देशोदेशींचे पर्यटक भारतात येतात. मला इतकी परदेशी गोरे, चिनी, आफ्रिकी, इत्यादी जोडपी दिसली ज्यात, पुरुष भरजरी शेरवानी, फेटा, आणि स्त्रिया जरतारी बनारसी साडी किंवा शरारा, दागदागिने घालून आले होते.केवळ ताज महालसमोरचा आपला फोटो अविस्मरणीय व्हावा, त्याला खास भारतीय बाज दिसावा म्हणून. अर्थात मला ही तो मोह जडला ..
कितीतरी पर्यटक या विषयावर भरभरून सांगत होते , बोलतं होते की अक्षरशः त्यांचे आयुष्यभराचे स्वप्न साकार झाले म्हणून मुरकत होते. अगदी माझ्या सारखी !
 कितीतरी जोडपी मधुचंद्रासाठी आली होती. ते ही ताज महलबद्दलची आख्यायिका ऐकून. खरंच एखाद्या प्रेमाचे स्थान एकूण मनातील व्यापलेले त्याचे क्षेत्र  हे वेगळं आणि वैशिष्टय़पूर्ण असतं. काही प्रेमाचे सौंदर्यमूल्य हे कोणत्याही परिस्थितीत अगदी दिमाखदार डौलाने उभ्या असतो. 
काहींच्या तर प्रेमाच्या कहाण्या प्रेरणादायी भूमिका साकार करतात. जसे की मुमताज आणि शहाजहान
थोडक्यात, ताज महालाच्या तळघरात काहीही असू दे – झाले गेले यमुनेला मिळाले. आजचा ताज सुंदर आहे आणि तो असाच सुंदर दिसत राहो!!
दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मला स्वतःला एकूण ताज महालाच्या 90 टक्के भागच पाहायला मिळाला. संपूर्ण ताजमहाल फिरून पाहिल्यावर ही 10 टक्के भाग मी कोणता पाहिला नाही हे कळतं नव्हतं. हे एक कोडं च माझ्या पुढे जाताना उभे राहिले. 
याच खुप दुःख वाटलं. खरंतर मूळ इमारत आणि त्याचे आजचे स्वरूप जे समाधीस्थळ आहे, दोन्हीतला फरक एकत्र पाहणे हा फार सुंदर अनुभव असू शकेल असं वाटलं नव्हतं. आपण ही ताजमहल खुशाल बघायला जा त्याचा अनुभव घ्या. त्याची वास्तुरचना आणि अंतरंगात भेट देऊन आपल्याला समजेल की जगातील सात आश्चर्यांपैकी ताज ला का गणले जाते. 
तुला ना मोह तु तुझ्याच रुपात
तोही अशा बदलांच्या परीघात
वेळ बदलली, काळ ही बदलतोय
करून मात साऱ्यांवरती तु मात्र उभा दिमाखात…
तेथिल ठरवलेल्या गाईडचा कानावर पडत जाणारा प्रत्येक शब्दातून जणू एखादं पात्र जिवंत झाल्यासारखं वाटतं होतं आणि त्या ऐतिहासिक क्षणांची साक्ष देत वलयांकित करतं मला त्या आभासी विश्वात घेऊन जात होतं. 
प्रेमपत्रे लिहिणाऱ्या तरुणांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत या सर्वानांच ताजमहाल एवढा आकर्षण का वाटावा? ते  हे पाहून कळलं
अशा या प्रेमाच्या गाथा, कथा, कहाण्या काळावर मात करून ठाम उभ्या असतात ताजमहाला प्रमाणे… आणि म्हणून कोणत्याही कालखंडामध्ये त्या समकालीन असतात. काही कथा तर पारंपरिक विचारव्यूहाला छेदतात, तर काही कथा रीतिभातींचा पुनर्विचार करायला भाग पाडतात. 
व्वा ताज! व्वा ताज!
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211
अशा या ‘ताजमहल’ साठी मला ही काही तरी लिहीण्याची ईच्छा झाली. विषय तसा सोपा होता पण लिहिणे मात्र कठिण झाले होते. कारण लेखन वेगळं आणि अनुभव घेऊन लेखन करणं हा वेगळा विषय होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *