Post Views: 69
नांदेड – मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी शासनस्तरावरुन विविध प्रयत्न केले जातात. परंतु मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनासोबतच शिक्षक आणि पालकांनीही एक नैतिक कर्तव्य म्हणून तसेच भाषाभिमान म्हणून लहान वयातच मराठीची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषेचा पाया शिक्षक व पालक मजबूत करु शकतात असे प्रतिपादन येथील प्रतिथयश साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले. यावेळी जवळा येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, हरिदास पांचाळ, मराठी भाषा विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण बोलीभाषा बालविकास शालेय समिती आणि मराठी भाषा संवर्धन नागरिक मंचाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ‘मातृभाषा विकासात शिक्षक व पालक यांची जबाबदारी’ या विषयावर भाष्य करण्यासाठी ढवळे यांना पाचारण करण्यात आले होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, लहान मुलांची पहिली भाषा ही मातृभाषाच असते. या वयातच मराठी भाषेचा पाया मजबूत करण्यासाठी , तसेच मातृभाषेतून शिक्षण व महत्व समजावून देण्याचे काम प्रभावीपणे पालक आणि शिक्षक चांगल्या प्रकारे करु शकतो. सद्या इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले आहे. त्याचे प्रचंड आकर्षण पालकांना आहे. इतर भाषा शिकणे अथवा ज्ञान मिळवणे वाईट नाही परंतु मातृभाषा ही तेवढीच महत्त्वाची असून त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे प्रासंगिक उद्घोषक आनंद गोडबोले यांनी केले. प्रास्ताविक संतोष अंबुलगेकर यांनी केले तर आभार संतोष घटकार यांनी मानले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे बाबुमियाँ शेख, चांदू झिंझाडे, प्रतिभा गोडबोले, संतोष मठपती, मायावती गच्चे, गंगाधर शिखरे, वंदना शिखरे, मारोती चक्रधर, बालाजी पांचाळ, शोभाताई गोडबोले, डॉ. सुजाता गोडबोले तर मराठी भाषा संवर्धन नागरिक मंचाचे मनिषा गच्चे, कविता गोडबोले, हैदर शेख, सुभाष शिखरे, गुणवंत गच्चे, मारोती चक्रधर, चांदू झिंझाडे, विलास गोडबोले, भीमराव गोडबोले, सुनील पंडित, संतोष घटकार, संजय कांबळे, नामदेव पांचाळ, बालाजी झिंझाडे, रमेश कदम, अनिल गवारे, अमोल गोडबोले, गंगाधर शिखरे, रुपाली हटकर, माया गोडबोले, पुरभाजी गोडबोले, पांडूरंग गच्चे
यांच्यासह बालक, बालिका उपस्थित होते.
——————————