महाराष्ट्रात सध्या सर्वत्र चर्चेत असलेला *सत्यशोधक* चित्रपट 3 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाने मनुष्याला आत्मभान व आत्मजागृतीची जाणीव करून दिली. या चित्रपटातील प्रसंग अंगावर शहारे आणणारे आहेत. महात्मा फुले यांना मारण्यासाठी आलेल्या लोकांना ते प्रतिउत्तर देताना म्हणतात” हे शरीर पैलवानाचे आहे व वस्ताद लहुजीच्या आखाड्यात तयार झालेले आहे “हे ऐकून प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देतात. ज्यावेळी वस्ताद लहुजी हातात काठी घेऊन पुढे येतात. तेव्हा सर्व समाज गप्प बसतो व मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होतो ही क्रांतिकारी घटना या चित्रपटात दाखविलेली आहे. एक पालक मुलीला मुलींच्या शाळेत घेऊन येण्यासाठी पोत्यात घालून पाठीवर आणतो. कारण समाजाने पाहिले तर तिला शाळेत येऊ देणार नाहीत म्हणून ही कल्पना मनुष्याच्या बुद्धीला चालना देणारी आहे. धरण बांधते वेळी झालेला भ्रष्टाचार हा सध्याचा भ्रष्टाचारी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रसंग आहे, म्हणून हा चित्रपट सर्वांनी कुटुंबासोबत पहावा. या चित्रपटांमधून वर्तमानपत्रे हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होते. खरोखरच पत्रकार व वर्तमानपत्र समाजाची ताकद असतात हे वेगळे सांगण्याची आज गरज नाही. त्या काळात ब्रिटिश सरकारकडून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यामुळे त्यांचा सत्कार झाला हे तमाम समाजाला भूषण वाटणारी घटना आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही मनाला लागणारा एक प्रसंग दाखविण्यात आला.शूद्र अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांना त्या काळात घरातील पाण्याचा हौद रिकामा करून दिला ही गोष्ट बरंच काही सांगून जाते. पाय चुकून पडलेल्या मुलींना प्रसूती होण्यासाठी त्यांच्या घरात जागा दिली हा प्रसंग आपण स्वतः विचार करून पहावा असा आहे ,त्याने बालविवाह रोखून समाजातील रूढी, प्रथा, परंपरा बदलण्याचाही प्रयत्न केला ही सोपी गोष्ट नव्हती, गुलामगिरी ,ब्राह्मणाचे कसब,तृतीय रत्न नाटक ,सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांच्या बोलण्यातून, अनुभवातून पुस्तकांची नावे आले व त्यांनी ते लिहिले त्यामुळे समाजात परिवर्तन केले. नाभिकांचा संप घडून आणला तुम्ही हे पाप करता? असे सांगून त्यांच्यात आत्मभान जागृत केले हे या चित्रपटातून पाहता येते, हा चित्रपट म्हणजे माणसाला माणुसकी शिकवतो तिथे आपले आत्मभान, आत्मजागृती ,आत्मज्ञान विचार करायला लावतो .जिथे पशूला मिरवणुकीतून फिरता येते? तेथे मानवाचा विटाळ होतो हे वाक्य अंत:करणाला विचार करायला लावते. स्वतःच्या वडिलांनी घरातून हाकलून दिल्यानंतर सुद्धा पत्नीला सोबत घेऊन वेगळे राहून जिद्दीन सामाजिक, शैक्षणिक कार्याला ते समोर जातात. मुस्लिम समाज बांधवांच्या मुलीला महात्मा फुलेंच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी शिकविले. दोन धर्मीयांना जोडणारा हा चित्रपट समाजामध्ये एकात्मतेचे बीज रोवितो, फातिमा शेख यांनाही शिकायचे आहे असे सांगून डोळ्याला अश्रू आणणारा हा प्रसंग मानवाला मानवता शिकवतो हे या ठिकाणी सांगावे वाटते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव फुले मृत्यूशय्येवर असताना महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव केले व आम्ही लोकांचे ऐकून मूर्ख झालो असे ते स्वतः कबूल झाले हेच या चित्रपटाची खासियत आहे, आणखी अनेक प्रसंग परिवर्तन करणारे आहेत. ते चित्रपट गृहात जाऊन आपण पहावेत काही प्रसंग राहून गेले असले तरी वेळेची मर्यादा येते. काही प्रसंग समजून घ्यावे लागतात. असे चित्रपट तयार करून दिग्दर्शकांनी समाजवादी समाज निर्माण करावा,शेवटी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्याविषयी केलेले माहिती दिली आहेत हे ऐकून तमाम चित्रपटातील लोक जागेवर उभे राहून दाद देतात हे चित्रपटातून आपणाला पाहायचे आहे. म्हणून चित्रपट निर्मात्यांनी असेच समाजामध्ये सकस विचार पेरणारे, विचारांची मशागत करणारे, माणसाला माणूस म्हणून उभे करणारे अस्सल मराठी चित्रपट उभे करून समाज प्रगल्भ करावा ही अपेक्षा …..
शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरका वाडी ता. मुखेड जि .नांदेड