मुदखेड : प्रतिनिधी
रोहीपिंपळगाव प्रकरणातील नराधमाला तातडीने अटक करून सदर खटला द्रुतगतीने चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईल, असे आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील एका चिमुकलीचे दि.14 रोजी अपहरण करुन तिच्यावर अपकृत्य करण्यात आले. त्यानंतर तिचा निर्घृण खून करुन मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झुडपात टाकण्यात आला. या घटनेविषयी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज रोहीपिंपळगाव येथे जावून पीडित कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
सदर चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तत्काळ अटक करण्यात यावी. त्याच्यावर गुन्हे दाखल करुन हा खटला फास्टट्रॅकवर चालविण्यात यावा व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी भावना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. पोलीस प्रशासनाने गुन्हेगाराला तातडीने अटक करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. या संदर्भात रोहीपिंपळगाव ग्रामस्थांच्या तीव्र भावना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जाणून घेतल्या. आपण पीडित परिवारासोबत आहोत असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख बारडकर, विधानसभा अध्यक्ष मारोती पाटील शंकतीर्थकर, शहराध्यक्ष माधव कदम, माजी सभापती रत्नाकर शिंदे, माधवराव शिंदे, गणेशराव शिंदे, मारोती जाधव यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी नाईक, पोलीन निरीक्षक वसंत सप्रे, उपनिरीक्षक कांबळे यांची उपस्थिती होती.
*निखाते व शिंदे कुटुंबियांचे सांत्वन*
रोहीपिंपळगाव येथील विशाल साहेबराव निखाते हा श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेसाठी गेला होता.त्याचे येथील तलावात बुडून निधन झाले. त्या सोबतच गावातील ज्येष्ठ नागरिक संभाजी सीताराम शिंदे यांचे वर्धापकाळाने निधन झाले. या दोन्ही कुटुंबियांच्या घरी जावून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन धीर दिला.