नांदेड – राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षक, विद्यार्थी पालक तसेच माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत या अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषयशिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, हरिदास पांचाळ, पांडुरंग गच्चे, मनिषा गच्चे, हैदर शेख आनंद गोडबोले मारोती चक्रधर आदींची उपस्थिती होती.
या अभियानांतर्गत शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम, आरोग्य आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास या मुद्यांच्या आधारे अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीनुसार मुल्यांकन होणार आहे. या अभियानात सहभागी होण्याच्या दृष्टीने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन पत्रकाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पत्रकाचे वाचन केल्यानंतर गावातून जनजागरण व वातावरण निर्मितीसाठी फेरी काढण्यात आली. या पत्रकातून मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळांच्या पालकांना व माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती आपले योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.