अडचणींचा सामना करीतच ध्येयाप्रत पोहचता येते -मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचे प्रतिपादन; खुरगावला धम्मदीक्षा संकल्प भवनाचा पायाभरणी समारंभ उत्साहात

नांदेड – खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हे धम्मचळवळीत अग्रेसर ठरले आहे. माझ्या हस्ते या पवित्र पावन भूमीत धम्मदीक्षा संकल्प भवनाचा पायाभरणी केली आहे, याचा मला आनंद आणि गौरव वाटतो. याठिकाणी धम्मसंकल्प भवनाच्या माध्यमातून एक भव्य स्तूप तयार होत आहे. या स्तुपाच्या पायाभरणीपासून ते लोकार्पण सोहळ्यापर्यंत आपले सहकार्य असणे अपेक्षित आहे. कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करीतच ध्येयाप्रत पोहचता येते असे प्रतिपादन येथील मनपा आयुक्त डॉ. महेशकुमारजी डोईफोडे यांनी केले.
ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित धम्मसंकल्प भवनाच्या पायाभरणी समारंभात बोलत होते. ताम्रपत्रावर बुद्धवचन लिखित करून ते कलशामध्ये ठेवून श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या संकल्पित श्रामणेर दीक्षाभूमी इमारतीच्या मध्य भूगर्भात आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सन्मान पुर्वक ठेवण्यात आले.
            यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघ तसेच रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेशदादा सोनाळे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते बापुराव गजभारे, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष माधवदादा जमदाडे, नेते प्रभु सावंत, काॅ. गणेश शिंगे, बहुजन हक्क परिषदेचे सुखदेव चिखलीकर, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस.एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, प्रज्ञाधर ढवळे, टी. पी. वाघमारे, बी. एम. मल्हारे, एल. एन. खंडेलोटे, रोहिदास भगत, देविदास भिसे, इंजि. भरत कानिंदे, इंजि. भीमराव धनजकर, संदीप मांजरमकर, डॉ. राजू सोनाळे, अशोक गोडबोले, संभाजी कांबळे, सिद्धांत इंगोले, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, देवानंद नरवाडे आदींची उपस्थिती होती. 
   
           ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ‘पौर्णिमोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत धम्मदीक्षा संकल्प भवनाचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, धम्मपालन गाथा, ध्यानसाधना, भोजनदान, बोधीपुजा, दान पारमिता, धम्मदेसना आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमारजी डोईफोडे यांच्या हस्ते प्रस्तावित धम्मसंकल्प भवनाची विधिवत पायाभरणी करण्यात आली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याचनेवरुन भिक्खू संघाने त्रिसरण पंचशील दिले.‌ त्यानंतर मान्यवरांचा व दानदात्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. इंजि. भरत कानिंदे यांचा बौद्ध राष्ट्र थायलंड येथे श्रामणेर म्हणून जीवन व्यतीत केल्याबद्दल विशेष सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी भिख्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली.
          या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तथागत नगर व गोविंद नगर येथील उपासकांच्या वतीने भिख्खू संघास व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांना भोजनदान देण्यात आले. दरम्यान मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांनी प्रस्तावित धम्मसंकल्प भवनाची उभारणी समाजाच्या दानातूनच होईल त्यासाठी २०२९ ची प्रतिक्षा करावी लागेल असे सांगितले. १९ फेब्रुवारी रोजी शहरातील गंगा काॅलनी, पंचशील नगर आणि श्रमसाफल्य नगर येथील महिला उपासिकांकडून भोजनदान देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रत्नमाला भावे, रेखाताई नाथभजन, हर्षपाली कांबळे, प्रतिक्षा कोल्हे, शिला पडघणे, सुरेखा इंगोले, करुणा राऊत, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, सागर नरवाडे, कल्याणी नरवाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपेक्षा हटकर यांनी केले तर आभार प्रा. एस. एच. हिंगोले यांनी मानले. तिसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध भीमशाहीर सुभाष लोकडे आणि संचाचा बुद्ध भीम प्रबोधन गितांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला.  कार्यक्रमासाठी विविध ठिकाणच्या बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *