नांदेड :देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी राहुल गांधी प्रखरतेने लढा देत असून, त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकजुटीने काम करून दडपशाहीला पराभूत करा आणि काँग्रेसला सत्तेत आणा, असे आवाहन महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केले आहे.
जिल्हा व शहर महिला काँग्रेसच्या वतीने येथील भक्ती लॉन्समध्ये आयोजित महिला मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तर प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे सहप्रभारी संपत कुमार, आशिष दुवा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश सरचिटणीस नाना गावंडे, रामविजय बुरुंगले, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मिनल खतगावकर, युवा नेत्या श्रीजया चव्हाण, मारोतराव कवळे, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी सभापती किशोर स्वामी, मसूद खान, प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, सुरेंद्र घोडजकर, माजी महापौर मंगलाताई निमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा ललिता शिंदे, महिला प्रदेश काँग्रेसच्या डॉ. रेखा चव्हाण, अनिता हिंगोले, अनुजा तेहरा, परवीन शेख, मीनाक्षी कागदे, छाया कळसकर, वर्षा भोसीकर, माजी सभापती संजय बेळगे, सुशीलाताई बेटमोगरेकर, शीलाताई भवरे, मोहिनी येवनकर, जयश्री पावडे, मंगलाताई धुळेकर, डॉ. अंकुश देवसरकर, शिवाजीराव धर्माधिकारी, मनोहर पवार, रोहिदास जाधव, संगीता डक आदी उपस्थित होती.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की देशामध्ये सध्या अराजकतेचे वातावरण तयार करण्यात आले आहे. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अशावेळी समाजाचा निम्मा घटक असलेल्या महिलांनी पुढे येऊन ही परिस्थिती बदलण्याचे काम केले पाहिजे. नांदेड येथील आजचा मेळावा हे खऱ्या अर्थाने लोकसभेचे रणशिंग फुंकणारा ठरणार आहे. नांदेड जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या जिल्ह्याने राज्याला चारदा मुख्यमंत्री पद दिले. देशाचे कणखर गृहमंत्री म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण यांची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा राज्याच्या विकासासाठी काम करत असताना जिल्ह्याकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिले नाही.
*भारत जोडो न्याय यात्रेला प्रचंड समर्थनः नाना पटोले*
याप्रसंगी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याचे सांगितले. केंद्रातील मोदी सरकारवर कठोर टीका करून भाजपने देशाची केवळ फसवणूक केली. त्यांच्या काळात महिलांवर अन्याय झाला. ऑलिंपिक विजेत्या महिला खेळाडू भाजपच्याच खासदारावर गंभीर आरोप करतात. त्याची साधी दखल सुद्धा हे सरकार घेत नाही. मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराची जगभरात नोंद घेतली गेली. मात्र, भाजप सरकारला त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. देशात आता कोणी गरिब राहिलेलेच नाहीत,अशा अविर्भावात केंद्र सरकार वागत असून, महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न गंभीर झाले आहेत. मात्र, त्याकडेही भाजप सरकारचे दुर्लक्ष असल्याने सर्वसामान्य नागरिक त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन देत असल्याचे आ. पटोले म्हणाले.
यावेळी संध्याताई सव्वालाखे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या महिला मेळाव्यात चेन्निथला, चव्हाण आणि पटोले यांनी तीनही नेत्यांचे धनगर समाजाच्या वतीने घोंगडी व काठी देऊन पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. पारंपारिक वेशात आलेल्या बंजारा भगिनींची मोठी संख्या लक्षवेधी होती. काँग्रेसच्या या मेळाव्याला महिलांची गर्दी ओसंडून वाहत होती. भक्ती लॉन्सचे विस्तीर्ण सभागृह खचाखच भरले होते. अनेक कार्यकर्त्यांना तर व्यासपिठावरच जाऊन बसावे लागले. शेवटी सभागृहात जागाच शिल्लक नसल्याने अनेक कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर उभे राहून नेत्यांची भाषणे ऐकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मीनल खतगावकर, सूत्रसंचालन उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे तर आभार प्रदर्शन डॉ. रेखाताई चव्हाण यांनी केले. यावेळी पूनिता रावत ,नंदा देशमुख, उज्ज्वला पत्रे, ज्योती पार्डीकर, सविता सातेगावे, लक्ष्मीबाई कल्याणकर, कांताबाई लखमोड, मधुमती सुंकलोड, पद्मावती सूर्यवंशी, सविता चव्हाण, शहनाज शेख, प्रतिभा लुंगारे, मेघा स्वामी, अनिता कदम, अर्चना मुकनार आदी महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या.
*महिला आरक्षण म्हणजे ताटात पुरणपोळी अन् जेवणांस मनाई!: अशोकराव चव्हाण*
नांदेड, दि. २९ जानेवारी २०२४:
महिला आरक्षणाची संकल्पना मूळची काँग्रेस पक्षाचीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस सरकारनेच घेतला होता. मात्र, संसद व विधीमंडळातील महिला आरक्षण लागू करण्यास केंद्र सरकार विलंब करते आहे. या सर्वोच्च सभागृहात महिलांना आरक्षण देण्याचे विधेयक तर पारित झाले. परंतु, त्याची अंमलबजावणी २०२९ पूर्वी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार म्हणजे ताटात पुरणपोळी तर वाढायची पण आठ दिवसानंतर जेवायला सांगायचे असाच आहे, अशी मार्मिक टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या महिला मेळाव्यात केली.
महागाई, बेरोजगारी अशा ज्वलंत मुद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. निवडणूक आली की महागाई कमी करायची आणि निवडणूक झाली की पुन्हा वाढवायची, असे या सरकारचे धोरण आहे. गॅस, पेट्रोल, शाळांची वाढती फी यामुळे घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांचे बजेट कोलमडले आहे. महिला भावनिक असतात. त्यामुळे भावनिक मुद्यांवर राजकारण करून त्यांची दिशाभूल केली जाते, मते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आता रामाच्या नावावर राजकारण सुरू झाले आहे. आपल्या मनात आणि देव्हाऱ्यात राम पूर्वीपासूनच आहे. राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सुटला. देवाच्या नावावर राजकारण करणे ही काँग्रेसची संस्कृती नाही. पुढील निवडणुकीत कदाचित रामाच्या नावावर ज्वलंत मुद्यांना बाजुला सारण्याचा प्रयत्न होईल. पण महिलांनी जागरूक राहिले पाहिजे. सोशल मीडियासारख्या माध्यमाचा वापर करून आपल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, महागाई सारख्या मुद्यावर आवाज उठवला पाहिजे,असे चव्हाण पुढे म्हणाले.