मुखेड : प्रतिनिधी
येथील मातोश्री भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने दि. ६ फेब्रुवारी रोज मंगळवारी सायंकाळी ६.०० वाजता कोत्तावार ऑईल मील बाऱ्हाळी रोड येथे, जेष्ठ फिजिशियन डॉ. अनंत सूर्यवंशी व प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. गौरव पुंडे यांचे हृदयरोगाची कारणे, उपचार- लक्षणे प्रतिबंध, सी पी आर, जीवन संजीवनी (प्रात्यक्षिकांसह) तपपूर्ती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. तुषार राठोड उपस्थित राहणार असून याप्रसंगी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. त्र्यंबक दापकेकर यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार देऊन संयोजन समितीच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे उपस्थित राहणार आहेत. मुखेड येथील सुप्रसिध्द् सर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉ . दिलीप पुंडे यांनी गेल्या १२ वर्षांपूर्वी आपल्या आईच्या नावाने मातोश्री भीमाई व्याख्यानमालेची सुरुवात केली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मुंबई येथील प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांनी ,’आई’ या विषयावर गुंफले, दुसरे पुष्प सातारा येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे यांनी सुंदर जगण्यासाठी या विषयावर गुंफले, तिसरे पुष्प सातारा येथील डॉ. राजेंद्र पवार यांनी सुजाण पालकत्व या विषयावर गुंफले, चौथे पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रा . डॉ तेज निवळीकर यांनी एकविसाव्या शतकासमोरील आव्हाने या विषयावर गुंफले, पाचवे पुष्प पुणे येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा सुप्रसिद्ध वक्ते डॉ . रामचंद्र देखणे यांनी ज्ञानदेवे रचिला पाया… तुका झालासे कळस … या विषयावर गुंफले, सहावे पुष्प जेष्ठ समाजसेवक तथा जीवनशैली व आरोग्य विषयाचे अभ्यासक अमरावती येथील डॉ. अविनाश सावजी यांनी शतायुषी व्हा, पासवर्ड आरोग्याचा या विषयावर गुंफले, सातवे पुष्प ताण- तणाव तथा नातेसंबंध समुपदेशक डॉ. सचिन देशमुख (औरंगाबाद) यांनी स्वभावालाही औषध असते या विषयावर गुंफले, आठवे पुष्प औरंगाबाद येथील जगन्नाथ दिक्षीत यांनी विनासायास वेट लॉस या विषयावर गुंफले, नववे पुष्प नांदेड येथील डॉ . श्रीराम राठोड व महाराष्ट्र राज्याचे अपंग विभागाचे माजी आयुक्त आर.के. गायकवाड यांनी विपश्चना परिचय व अनुभूती या विषयावर गुंफले , 10 वे पुष्प जीवन त्यांना कळले हो या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ . यशवंत पाटणे (सातारा) यांनी गुंफले, 11 वे पुष सुप्रसिद्ध माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी पसायदान या विषयावर गुंफले.
तर दिनांक सहा फेब्रुवारी रोज मंगळवारी फिनिक्सचे जेष्ठ फिजिशियन डॉ. अनंत सूर्यवंशी व ग्लोबलचे
इंटरव्हेशनल कॉर्डियॉलॉजिस्ट डॉ. गौरव पुंडे हे हृदयरोगाची कारणे, उपचार- लक्षणे प्रतिबंध, सी पी आर, जीवन संजीवनी, प्रात्यक्षिकांसह तपपूर्ती पुष्प गुंफणार आहेत.
प्रत्येक पुष्पात समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा सन्मान प्रतिवर्षी करण्यात येतो. कोविड नंतर हृदयरोगाचे प्रमाण लक्षणीय वाढले असून मृत्यूदरसुद्धा वाढला आहे.
स्पर्धांच्या युगात ताणतणाव वाढला असून प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. आपली काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. मातोश्री भीमाई व्याख्यानमाला व गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मुखेडभूषण डॉ . दिलीप पुंडे, सौ. माला पुंडे, संजय पुंडे, डॉ. तेजस्वीनी गौरव पुंडे , यांच्यासह मातोश्री भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.