मुखेड-इतरांच्या आरोग्य सांभाळता सांभाळता स्वतःचे आरोग्य बिघडू देऊ नका. जीवनशैली सकारात्मक व हसरी ठेवा. मन निरोगी ठेवण्यासाठी चेहऱ्यावर निरपेक्ष हसू ठेवा. सिरीयल पाहण्याबरोबरच वृत्तपत्र वाचत चला. छंद जोपासा. एकमेकांचे कौतुक करायला शिका .बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. बँकेचे व्यवहार करायला शिका. जगणं सुंदर आहे फक्त आपले विचार चांगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहायला शिका. स्त्री शिवाय घराला घरपण नाही. हळदीकुंकू म्हणताना हळद (स्री) पहिल्यांदा व कुंकू (पुरुष )नंतर येतो असे प्रतिपादन सौ.ज्योती डोळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष युवक शिबीर प्रसंगी केलेल्या महिला प्रबोधन व हळदीकुंकू कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना मौजे सांगवी (बे.)ता.मुखेड येथे केले.
या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना प्राचार्या सौ.शोभा बिरादार म्हणाल्या की प्रत्येक स्त्रीमध्ये खूप शक्ती असते. या देशाला, समाजाला स्वर्ग किंवा नरक बनवू शकते. स्त्रीकडे प्रामाणिकपणा, सहनशीलता असते. स्वप्न पाहायला शिका.संकटांना घाबरू नका. संकटांनी खचून पुरुष आत्महत्या करतो पण स्त्री करत नाही. ती सर्व काही सहन करते. निसर्गाने स्त्रीला सहनशीलता दिली आहे. पती मेल्यावरही ती काबाड कष्ट करून सांभाळते.
जिजाऊ,सावित्री, झाशीची राणी, सिंधुताई सपकाळ या स्त्रियांनी केलेले आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगा. परिस्थिती एकसारखी राहत नाही. याकडे बघून जगा. हार मानू नका. स्त्रीला प्रत्येक भूमिका पार पाडाव्या लागतात. स्त्री इतरांचा विचार करताना स्वतःकडे दुर्लक्ष करते. तसे होऊ देऊ नका.एडिसनच्या आईने त्यांच्यावर सकारात्मक संस्कार केले.
कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की सर्वच क्षेत्रात महिलांची आघाडी आहे. घराला कसा आकार द्यायचा ते त्यांच्या हातात आहे. महिला घराची लक्ष्मी असते. प्राचीन काळापासून स्त्रीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. पृथ्वी,वसुंधरा म्हणणे म्हणजे स्त्रीत्वाचा आधार असतो. रामायण व महाभारत स्त्रीमुळे घडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ.अरुणा ईटकापल्ले यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.डाॅ.सरोज गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.शिल्पा शेंडगे यांनी मानले.
कार्यक्रमास सौ. राजश्री हरिदास राठोड, सरपंच सौ. मीनाताई जोंधळे,प्रा.डाँ.कविता लोहाळे, सौ.वंदना गायकवाड,सौ लक्ष्मीबाई करडखेले,रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. निवृत्ती नाईक,प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रामकृष्ण बदने, प्रा.डाॅ.महेंद्र होनवडजकर, प्रा.लक्ष्मण अदावळे, प्रा.डॉ.बालाजी राठोड, प्रा. सुनील पवार, ग्रामस्थ महिला, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.