आर्थिक स्थिती हलाकीची तरी चांगले संस्कार व वैचारिक समृद्धी विपुल असली की असाध्य ते साध्य करता येते. आई निर्मला व वडिल त्र्यंबक यांना गरीबीमुळे शिक्षण घेता आले नसल्याचे शल्य होते. परंतु भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षण विषयक विचारधारा मनोमन अंगिकारत त्यांनी राजेश्वरला उच्च शिक्षण दिले. शिक्षणा सोबतच चांगले संस्कार दिले. ऐन तारूण्यात राजेश्वर कांबळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश केला. आणि सर्व समाज घटकातील सामान्य माणसाचे प्रश्न अग्रक्रमाने हाताळले. पत्रकारितेतून समाजसेवेचे व्रत स्वीकारात अनेकांना न्याय देऊन नावलौकिक मिळवला.
अभ्यासू , शांत स्वभाव, जिद्दी, दूरदर्शी, मैत्री जपणारा, प्रामाणिक आदी गुणवैशिष्ट्ये असलेला हा तरूण पत्रकारिता क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करेल? असे अनेकांना कदाचित वाटले नसेल. परंतु आपल्या बुद्धी चातुर्याने, विषय हाताळणीच्या वेगळ्या लकबीने, भाषा व शब्दाचा योग्य समन्वय साधून अनेकांचा अंदाज फोल ठरवला आहे. आपली बुद्धी, लेखन कौशल्य यथोचित उपयोगात आणले तर यश दूर नसते. याची प्रचिती राजेश्वरकडून अनुभवता येईल.
बालपण ऐतिहासिक वारसा असलेल्या कंधार शहरात गेले. प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण कंधार येथे पूर्ण केले. शिक्षण क्षेत्रात आपल्या शैक्षणिक कार्य व गुणवत्तेचा ठसा प्राचार्य कै.डॉ.ना.य डोळे यांनी सर्वदूर पोहचविला. महाविद्यालयातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आवडी-निवडीचा कल पाहून डोळे सरांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यातून लाखो विद्यार्थ्यांची जडणघडण झाली.
अशा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथून राजेश्वर यांनी आपल्या आवडीच्या अर्थशास्त्र या विषयात एम.ए.केले. बी.एड्, पत्रकारितेतील बि.जे. व एम.जे.ची पदव्यूतर शिक्षण पूर्ण केले. संपूर्ण शिक्षण भारत सरकारच्या तुटपुंज्या शिष्यवृत्तीवर पूर्ण करणे जिकिरीचे होते. परंतु आई-वडीलांनी अथक आर्थिक संघर्ष केला. हा आर्थिक अंधार दूर करायचा. समाजातील शेकडो कुटुंबाच्या मदतीला उपयोगी पडायचे. असा निश्चय करून राजेश्वर यांनी राॅकेलच्या चिमणी पुढे अभ्यास केला. आणि संपूर्ण शिक्षण पूर्ण केले.
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा अवगत असल्याचे त्याच्या संवादातून, आणि वागण्यातून त्याच्या संस्कार व शिक्षणाची प्रचिती येते. अनेक शिक्षक आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभलेला राजेश्वर कांबळे विचारांनी अत्यंत प्रगल्भ व दूरदर्शी आहे. त्यांच्याकडे बोलण्याची प्रभावी शैली आहे. बालपणीच आर्थिक चणचण अनुभवली. वयाच्या अकराव्या वर्षी घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम सहा वर्ष केले. अवघ्या दीडशे रुपयाचा मोबदला मिळत होता. याच काळात पत्रकारांशी संबध आला. राजेश्वर कांबळे यांच्यावर तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, कृषी व धार्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांचा सहवासही लाभल्याने व्यक्तीमत्व बहरत गेले.
पत्रकारितेत रूची असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणा नंतर राजेश्वर कांबळेनी पत्रकारितेेला सुरुवात केली. समाजातील मागासवर्गीय, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, सामान्य माणसाचे प्रश्र मार्गी लागावेत. ही त्यामागची व्यापक भूमिका होती. गत वीस वर्षांपासून पत्रकारितेची मूल्ये जपत व जोपासत त्यांनी निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेवर भर दिला आहे. पत्रकारिता सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेली. अशी टीका होत असताना
राजेश्वर कांबळे याचा मात्र अपवाद ठरतो. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बातमीचे शीर्षक सोप्या भाषेत असतात. अभ्यासू व शोध बातम्या देत असल्याने विश्वासनीयता निर्माण झाली. कृषी, राजकीय, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आदी बातम्यानी सर्वांचे लक्ष वेधले. दोन दशकातील विविध क्षेत्रातील लेखनाची दखल घेऊन विविध संघटना, सेवाभावी संस्थानी राजेश्वर कांबळे यास विविध पुरस्काराने गौरविले आहे. असेच उत्तरोत्तर समाजसेवेसाठी माझ्या आवडत्या विद्यार्थी मित्राला उदंड निरोगी आरोग्य लाभो.
– डॉ.गंगाधर तोगरे
‘राजगड’ कंधार जि.नांदेड
मो.९४२३६५६३४५