· मतदान साहित्यांसह पोलींग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना
· राष्ट्रीय कर्तव्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची लगबग
· मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
· मतदान ओळखपत्रांसह इतर बारा ओळखपत्रे पुरावे म्हणून ग्राह्य
#नांदेड दि. 19 नोव्हेंबर : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी एकूण 15 हजार 886 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज शासकीय तंत्रनिकेतन येथे 87 नांदेड दक्षिण व 86 नांदेड उत्तर मतदार संघासाठी तर विधानसभा निहाय ठिकाणावरुन नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासनातर्फे मतदान साहित्य हस्तांतरीत करुन दुपारपर्यत मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले.
सकाळी 7 पासून राष्ट्रीय कर्तव्यासाठी सज्ज असलेले झोनल अधिकारी, मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांची शासकीय तंत्रनिकेतन येथे मतदान साहित्य हस्तगत करण्याची लगबग सुरु होती. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपले आदेश, मतदान केंद्राबाबत माहिती, ओळखपत्र हस्तगत करुन मतदान केंद्राचा मार्ग, आपल्या गटातील अधिकारी कर्मचारी कोण आहेत याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लगबग दिसुन आली. मतदानासाठी सज्ज असलेल्या व राष्ट्रीय कर्तव्यासाठी तत्पर असलेल्या अधिकारी कर्मचा-यामध्ये एक अनोखा उत्साह दिसून आला. आज सर्व कर्मचारी मतदान साहित्य हस्तगत करुन त्या साहित्यांची तपासणी करुन मतदान केंद्राकडे रवाना झाले. तत्पुर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकारी स्ट्रॅाग रुममधून आज इव्हिएम मशिन बाहेर काढून पोलिंग पार्ट्यांना हस्तांतरीत करण्यात आल्या. दुपारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पोलींग पाटर्याना त्यांच्या बसमध्ये जावून शुभेच्छा दिल्या. आज 5 नंतर टप्याटप्याने पोलिंग पार्ट्या बुथवर रात्री उशिरापर्यत पोहोचतील.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान एकूण 3 हजार 88 मतदान केंद्रावर होत आहे. यासाठी 15 हजारावर प्रशिक्षित कर्मचारी तर जवळपास 8 हजार सुरक्षा व पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड मतदार संघासाठी 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट असून हे उदिष्टपूर्ती करण्यासाठी मतदारांनी मोठया प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे. मतदारांनी मतदान यादीत नाव असेल तर मतदान ओळखपत्रासह इतर 12 ओळखपत्रे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य 12 ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य – जिल्हाधिकारी
मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल, अशी माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी ही माहिती दिली. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र आहे, असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार ओळखपत्र नसणाऱ्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.
00000
#विधानसभानिवडणूक२०२४
#लोकसभापोटनिवडणूक
#नांदेड
#मतदानकरूया
#मतदान