नांदेड , दि.20 नोव्हेंबर :- विष्णुपूरी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र संपूर्ण नैसर्गिक झावळ्यांनी, विविध रोपांनी, प्लास्टिक मुक्तपणे तयार केला आहे. पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्यांची, मडक्याचा वापर केला आहे. ग्रीन मँट प्रवेशद्वारापासून अंथरली असून विविध फुलझाडांच्या कुंड्यांनी प्रवेश केला जात आहे. केळीची पान, पारंब्या, हिरव्या नारळाच्या झावळ्या उपयोगात आणल्यामुळे परिसर थंडगार व रमणीय आकर्षक झाला आहे. या केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने भाग घेतला. या इको फ्रेंडली मतदान केंद्राच्या आकर्षक व हिरवाईने तयार केलेल्या मतदान केंद्राबाबत अनेक नागरिक , मतदार यांनी भेट देवून समाधान व्यक्त केले.
चुनाव का पर्व, देश का गर्व संकल्पनेतून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशातील महाराष्ट्रात आज सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाने यावर्षी इकोफ्रेंडली मतदार ग्रीन मतदार बुथ उभारणीसाठी सूचना दिल्या होत्या. याच सूचनेनुसार जिल्हा ग्रामीण स्विप कक्षाच्या प्रमुख तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, दिलीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.हायस्कूल विष्णुपूरी प्रशालेने इकोफ्रेंडली मतदान बुथ तयार केले आहे.
नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू , महसूल सहाय्यक मकरंद भालेराव, स्वीप कक्ष सदस्य राजेश कुलकर्णी व संजय भालके यांनी भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला जाधव, एम.ए.खदीर , मिरा रेवणवार , पद्माकर देशमुख ,कावळे गुरुजी आणि सर्व शिक्षकवृंदांनी भरीव परिश्रम घेतले आहेत.
00000
#विधानसभानिवडणूक२०२४
#लोकसभापोटनिवडणूक
#मतदान
#नांदेड