अन्न वाया जाऊ नये व कोणीही उपाशी राहू नये या संकल्पनेतून धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी सुरू केलेल्या भाऊचा माणुसकीचा फ्रिज उपक्रमांतर्गत भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या मुलांच्या लग्नात शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ मध्यरात्री रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथील प्रवाशांना नवदांपत्यांनी वाटप करून समाजसेवेचा नवीन पायंडा पाडत आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नाचा आनंद साजरा केला.
रविवारी सुरेश लोट यांच्या शिवा व शिवचरण या दोन्ही मुलांच्या लग्नाचा स्वागत समारंभ बाबा फतेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे ठेवण्यात आला होता. पाच हजार लोकांचे जेवण बनवण्यात आले होते.रविवारी लग्नाची तिथी मोठी असल्यामुळे नांदेड शहरात अनेक कार्यक्रम होते. त्यामुळे प्रत्यक्षात तीन हजार लोकच कार्यक्रमाला आले. त्यामूळे भरपूर अन्न शिल्लक राहिले. लग्नाचा दिवस नवदांपत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. शिल्लक राहिलेले अन्न प्रवाशांना वाटप केले तर चांगले होईल अशी कल्पना दिलीप ठाकूर यांनी सुचवली. सुरेश लोट यांनी आपली दोन्ही मुले आणि सुनांच्या हस्ते जेवण वाटप करण्याचा निर्णय घेतला. छोटा हत्ती मध्ये सर्व खाद्यपदार्थ घेऊन दिलीप ठाकूर, सुरेश लोट, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा यांनी रेल्वे स्टेशन व बस स्थानक गाठले. नुकतीच अजंठा एक्सप्रेस आली असल्यामुळे भरपूर गर्दी होती. ताजे जेवण आणल्याची सूचना सर्वांना देण्यात आली. शिस्तीत रांग लावल्यानंतर शिवा व रिना तसेच शिवचरण व तुलसी या नवदांपत्यांनी लग्नाच्या ड्रेस मध्येच जेवण वाटप केले. हा आगळावेगळा सोहळा अनेक प्रवाशांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. नवीन सुनांनी या सेवेमुळे समाधान मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. मध्यरात्री प्रवाश्यांनी रुचकर भोजनांचा आस्वाद घेऊन नवदापंत्यांना आशीर्वाद दिले. शिल्लक राहिलेले अन्न अनेक जण वाटप करतात. पण लग्नाच्या दिवशी वधू-वरांनी स्वतः मध्यरात्री जेवण वाटप करण्याची घटना पहिल्यांदाच घडली. त्यामुळे लोट परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख फरीद, शेख नवाज, शेख जाफर, जयसिंग डूलगच, शुभम लोट, सौरभ माचेलू,गणेश डूलगच, नरेश लोट, शुभम माचेलू,कार्तिक डूलगच,सौरभ शर्मा,विजय घाटोळ, श्री सावंत ,कृष्णा घाटोळ ,रवी लोट यांनी परिश्रम घेतले.पंचवटी हनुमान मंदिर, महावीर चौक नांदेड येथे बसवण्यात आलेल्या भाऊच्या माणुसकीच्या फ्रिजमध्ये गेल्या दीड वर्षापासून दररोज ४० ते १२० जेवणाचे डबे विविध व्यक्तींच्या वाढदिवसा निमित्त अथवा स्मृतिदिनानिमित्त लोक सहभागातून ठेवण्यात येतात . त्यानंतर खऱ्या गरजूंना अन्नदात्यांच्या हस्ते डबे वाटप करण्यात येतात. याशिवाय ज्यांच्या घरी अन्न शिल्लक राहिले त्यांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फ्रीज च्या ठिकाणी आणून दिल्यास व संध्याकाळी सहानंतर रेल्वे स्टेशन वर आणून दिल्यास अन्न वाटपाची व्यवस्था करण्यात येते. तरी जास्तीत जास्त नांदेडकरांनी या अनोख्या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.