आज मराठी भाषा दिन ही आहे त्यामुळे आपल्या भाषेवर भरपुर प्रेम करा आणि न आणि ण यातील फरक समजून घ्या..
मी अनेक कार्यक्रमाना वक्ती म्हणुन जाते आणि मंडळी माझ्या अनुभवांचा मनमुराद आनंद लुटतात त्याचं कारण मी भरभरुन जगते . पण बऱ्याचदा मी कोणालाही काहीही देत नाही तर त्यांच्याकडुन घेउन येते हेही तितकच खरं..
दामोदर निवासी संघ हिंगणे सिंहगड रोड येथे मा. श्री. देशपांडे सरानी माझा कार्यक्रम ठेवला होता.. मला रीसीव्ह करायला सर बाहेर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद , सकारात्मकता पाहून मीच फ्रेश झाले.. पाटील सरांच्या बंगल्याच्या पार्कींगमधे साधारणपणे ८०/९० तरुण ( वय वर्षे ७० च्या आसपास) एकत्र येतात आणि कार्यक्रम करतात. पाटील सर जागा देतात हेही कौतुकास्पद आहे कारण हे पुणे आहे हो.. त्यांच्याशी बोलताना समजलं की , ते कोकणातले आहेत त्यामुळेच जागा देत असावेत ही माझी कंसेप्ट क्लीअर झाली..
काही मुद्द्यांवर आमची चर्चा होते न होते तोपर्यंत सगळं पार्कींग त्या तरुणानी भारुन गेलं.. त्यात जास्त संख्या ही तरुणींची होती.. सगळ्याजणी मस्त साड्या नेसुन तयार होवुन आल्या होत्या.. ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयस्कर मंडळी असं वाटलं होतं पण जेव्हा त्या सकारात्मकतेला पाहिले तेव्हा जाणवलं की या वयात आपल्यालाही असं रहाता यायला हवं. सगळे येण्याआधी देशपांडे सरानी मला एक वाक्य सांगितले होते , की सोनल मॅडम , स्त्रीया संपूर्ण कार्यक्रम एंजॉय करतात पण पुरूष थोड्या वेळात निघुन जातात पण माझ्या बोलण्यावर माझा विश्वास होता. तुम्हाला सांगते एकही तरुण मुलगा शेवटपर्यंत जागेवरुन हलला नाही..
अध्यात्म , लैगिकता, डाएट , व्यायाम , तृतीयपंथी , अंध, वृद्ध , एकपात्री अभिनय अशा अनेक विषयांवर साधारणपणे दीढ तास माझ्या मुखातुन भगवंत बोलत होता आणि टाचणी पडली तरी आवाज आला असता इतकी शांतता तिथे होती.. मी त्यांच्यापेक्षा वयाने खुप लहान असूनही त्यांनी माझं संपूर्ण बोलणं ऐकलं आणि शेवटी सगळे म्हणाले , तुम्ही छान बोलता परत या ना.. खरं तर हे मी बोललेच नव्हते .. सगळी माझ्या कृष्णाची कमाल आहे पण कालची संध्याकाळ मी जवळपास ८० लोकांना आनंद द्यायला माध्यम झाले हेच माझं काय ते कर्तृत्व.. देणाऱ्याने देत जावे..घेणाऱ्याने घेत जावे..
तिथे गर्दीही होती आणि सगळे दर्दीही होते त्यामुळेच त्यांच्या मनातील प्रश्नांना मला उत्तरे देता आली..आणि नव्याने भरभरुन जगताही आलं.. जेव्हा फार कुठल्याही अपेक्षा न ठेवता आपण दुसऱ्यासाठी आनंद द्यायचा विचार करतो तेव्हा आपली झोळी आनंदानें ओसंडुन वहाते याचा प्रत्यय मी अनेकदा घेते.. फक्त देत रहा.. भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितले आहे की निष्काम कर्म करा..
आपण माणसे आहोत त्यामुळे अवघड असले तरीही जमु शकते..
मी या सगळ्या बद्दल या संघाची आणि देशपांडे सरांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते…पुन्हा आज कोणाला तरीआनंद द्यायला नव्याने सज्ज आहे..
सोनल गोडबोले