पतीने गळफास घेऊन तर पत्नीने विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली!  ———- कंधार तालुक्यातील इमामवाडी येथील हृदय द्रावक घटना !.

(कंधार: विश्वंभर बसवंते )
        कंधार पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इमामवाडी येथील रहिवासी रामदास सोपान करेवाड वय ३५ वर्षे यांनी चिंचेच्या झाडाला दस्तीने गळफास लावून आत्महत्या केली तर मयताची पत्नी वर्षा रामदास करेवाड वय ३० वर्षे या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदय द्रावक घटना तालुक्यातील इमामवाडी येथे घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
      आज दि.१५ एप्रिल २०२४ रोज सोमवारी सकाळी ११:०० वाजता चे सुमारास  इमामवाडी येथील रहिवासी रामदास सोपान करेवाड यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मयताच्या पत्नीस कळताच मयताची पत्नी वर्षा रामदास करेवाड या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मयत दाम्पत्याच्या पश्चात १ मुलगा व १ मुलगी असे दोन चिमुकले अपत्य आहेत, या घडलेल्या ह्रदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
       ही बाब कंधार पोलीस स्टेशनला कळताच कंधार चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार शिवाजी सानप, बापूराव व्यवहारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा करून दोन्ही प्रेत कंधार ग्रामीण रुग्णालय येथे शेवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.
        मयत रामदास सोपान करेवाड यांचे चुलत भाऊ संतोष प्रभाकर करेवाड राहणार इमामवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस स्टेशन मध्ये सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे दाखल करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिवाजी सानप हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *