आरोग्‍य विभागात 10 वा आंतरराष्‍ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

नांदेड दि. 21 :- योग शास्‍त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, स्‍थुलपणा, थॉयराईड वृध्‍दी, मनोविकार, सांध्‍याचे विकार तसेच सध्‍याच्‍या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार, योग करण्‍यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्‍या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्‍यास व रोग मुक्‍त होण्‍यामध्‍ये मदत मिळते, यासोबतच सकारात्‍मक उर्जा मिळते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्‍या निर्देशानुसार जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांच्‍या मार्गदर्शनात जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र, आयुर्वेदीक दवाखाने, युनानी दवाखाने, नागरी दवाखाने व उपकेंद्र येथे आज योग दिनासाठी प्रात्‍यक्षिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

आयुष मंत्रालयाने Yoga for Self and Society योग स्‍वयंम और समाज के लिए ही संकल्‍पना आयुष मंत्रालयाने 21 जून 2024 रोजी ठेवली आहे. आरोग्‍य विषयक समस्‍या समुदाय स्‍तरावर वाढताना दिसत आहेत. या समस्‍यांवर नियंत्रण आणण्‍यासाठी व निरामय आरोग्‍यासाठी आहार-विहारात बदल करण्‍याची गरज आहे. यासाठी योगाचा अंगीकार करणे व तो समुदायस्‍तरावर नेऊन समाजाला आरोग्‍यदायी करणे हे या संकल्‍पनेच्‍या केंद्रस्‍थानी आहे. तरी नागरीकांनी आपल्‍या दैनंदिन जीवनात योग व प्राणायामचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले.

जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालय, उपजिल्‍हा रुग्‍णालये, ग्रामीण रुग्‍णालये येथेही रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन कार्यक्रम साजरा करण्‍यात आला व योग दिनासाठी प्रात्‍यक्षिक कार्यशाळा घेण्‍यात आली होती .जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्‍या मार्गदर्शनात आज 21 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता आंतरराष्‍ट्रीय योग दिन कार्यक्रम व प्रात्‍यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी अति.जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.सलमा हिरानी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राजाभाऊ बुट्टे यांनी धन्‍वंतरी पूजन व दिपप्रज्‍वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. जिल्‍हा आयुष अधिकारी डॉ. सत्‍यनारायण मुरमुरे, आयुष वैद्यकिय अधिकारी डॉ. जवादुल्‍लाह खान, आयुष कार्यक्रम व्‍यवस्‍थापक डॉ. सुनिल भंडारे व सुभाष खाकरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत योग प्रशिक्षक मधूकर भारती यांनी योग प्रात्‍यक्षिके करुन योग व प्राणायाम बाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन योगासने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *