माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही राष्ट्रसेवा समजून मोहिमेत उत्स्फुर्त सहभागी व्हा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


 
नांदेड (जिमाका) दि. 14

 :- कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गजन्य असल्याने बाधितांची वाढती संख्या दुर्लक्षून चालणार नाही. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाच्या जबाबदार वर्तणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये जबाबदार वर्तणाची जाणीव व आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहिम हाती घेतली आहे. प्रत्येक घरा-घरातील अबाल वृद्धांपर्यंत आरोग्य सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात यावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तींने या मोहिमेत राष्ट्रसेवा समजून उत्स्फुर्त सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची झुमॲपद्वारे आढावा बैठक नुकतीच झाली. या बैठकीत त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करुन ही मोहिम अधिकाधिक लोकाभिमूख कशी करता येईल याबाबत विचारविनिमय केला. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय व शहरात, महानगरात वार्ड निहाय पथके स्थापन करण्यात आली असून या पथकातील सदस्य घरो-घरी जाऊन प्रत्येकांची आरोग्यविषयक चौकशी करतील. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. हे पथक घरातील सर्व सदस्यांचे तापमान (SpO2) तपासणी व घरातील एखादा सदस्याची कमोबीड स्थिती आहे का याची माहिती घेतील.
 
या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत आणि दुसरा टप्पा 14 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व विभागांचा योग्य तो समन्वय साधला गेला असून स्थानिक स्वयंसेवक यासाठी पुढे येऊन सर्वांच्या आरोग्या सुरक्षितेच्यादृष्टिने आपआपले योगदान देतील अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *