फुलवळ ( धोंडीबा बोरगावे ) कंधार तालुक्यातील फुलवळ येथे मोहर्रम चा उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षाची परंपरा असून, हा उत्सव हिंदू – मुस्लिम बांधव एकत्रित येवून मोठ्या उत्साहात साजरा करत, सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक दाखवून देतात हे विशेष!.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून ता. १३ जुलै रोजी मौलाअली ही सवारी उठल्यानंतर आज ता. १४ जुलै रोज रविवारी रात्री काशीमदुल्हा व ता. १५ जुलै रोज सोमवारी नालेहैदर उठणार आहेत, तर ता.१७ जुलै रोजी दहावी म्हणजेच मोहर्रम उत्सवाची सांगता होणार आहे.
या चार दिवसांच्या मोहरम उत्सव कार्यक्रमात धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक असे विविध उपक्रम साजरे केले जातात.या मोहरम कार्यक्रमासाठी सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या थाटामाटा साजरा करतात.
सण , उत्सव कोणताही असो सर्व जाती , धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा फुलवळकरांनी अजूनही जपली असून सामाजिक बांधिलकी समजून सण , जयंती उत्सव कोणाचाही असो त्यात एकंदरीत सर्वचजण एकदिलाने सामील होऊन ते पार पाडत असतात.
तसं पाहता फुलवळ हे गाव अंतर्गत जातीवाद , धर्मभेद , उच्यनीच अश्या अनेक बाबीपासून आधीच कोसोदूर असून वाडवडिलांनी घालून दिलेल्या अनेक परंपरा आजही कायम स्मरणात ठेऊन गुण्यागोविंदाने गावात नांदत असतात. त्यामुळे कधीच टोकाची भूमिका घेऊन आजपर्यंत कोणाचाही कसलाही वाद टोकाला जाऊन गावात कधीच जातीवाद , धर्मभेद , गटबाजी झाल्याचे दिसून आले नाही. मग ते कोण्या महापुरुषांची जयंती , पुण्यतिथी असो का कोणता धार्मिक सण , उत्सव असो .
मोहर्रम बद्दल बोलायचे झाले तर शेकडो वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर सर्वदूर फुलवळ च्या मोहर्रम चे माहात्म्य नावारूपाला आलेले आहे . विशेष म्हणजे याच मोहर्रम उत्सवात मौलआली , काशीमदुलहे , नालेहैदर , कौडीपीर , डोला या सवाऱ्यांची स्थापना करून त्यांचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो . आणि याच उत्सवात सवारीचे देवकर म्हणून अनेक हिंदू व्यक्तीही ती सवारी धरतात.