मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी मनपाचे 23 मदत केंद्र

 

· आतापर्यंत जवळपास 12 हजारावर अर्ज प्राप्त
· जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन
· अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची अर्ज भरुन घेण्यासाठी घरोघरी भेट

नांदेड दि. 24 जुलै :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वार्ड समिती केंद्रामार्फत पात्र लाभार्थी महिलाचे अर्ज संकलित करण्याचे कामकाज नांदेड महानगरपालिकेच्या 23 मदत केंद्रामार्फत सुरु आहे. तसेच अंगणवाडी सेविकाही घरोघरी जावून पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याचे काम प्राधान्याने करीत आहेत. आतापर्यत मनपाच्या मदत केंद्रावर ऑफलाईन 5 हजार व ऑनलाईन 1 हजार 500 असे एकूण 6 हजार 500 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांनी घरोघरी भेट देवून 5 हजारावर अर्ज संकलित केले आहेत. आजपर्यत असे जवळपास 12 हजारावर अर्ज प्राप्त झाले आहेत. तरी जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आपले अर्ज भरावेत, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी शहरी भागात वार्डनिहाय समित्या गठीत केल्या आहेत. तसेच मनपाच्यावतीने 23 मदत केंद्र सुरु केले आहेत. या मदत केंद्रामार्फत आजपर्यत प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करुन पात्र, अपात्रतेची यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी मनपाच्या वार्ड समितीची मान्यता घेवून प्रकाशित केली जाणार आहे. अंतिम यादी जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.

या योजनेतील पात्र महिलांचे अर्ज संकलित करण्यासाठी मनपाच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर घरोघरी भेट देवून अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करीत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी पहिला हप्ता दिला जाईल यांची दक्षता सुध्दा घेतली जात आहे. तरी नांदेड शहरातील पात्र महिलांना सेतू सुविधा केंद्र ,नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तसेच मनपाचे मदत केंद्रावर येवून हा अर्ज भरता येईल. तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *