विवेकवादी विचारवंत : डॉ. लुलेकर

‘‘नांदेड येथे स्मृतिशेष शंकरराव चव्हाण यांची जयंती दिनानिमित्त ‘कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर यांना दिनांक १४ जुलै रोजी प्रदान केला . त्यानिमित्ताने त्यांचा परिचय करून देणारा लेख

 

मानवी जीवनाला कुशल व अकुशल मार्गाची दिशा देण्यासाठी आतापर्यंत सृष्टीच्या इतिहासात अनेक महात्मे, महापुरुष, संत, सुधारक, विचारवंत होऊन गेले. या लाखो वर्षांच्या परंपरेने मानवी जीवनाची वहिवाट रुंदावली. अशाच विचारवंतांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर मानवी जगण्याला आकार दिला. तसेच महाराष्ट्रातील लोकप्रबोधनाच्या भूमीत अनेक विचारवंत, लेखक, कलावंत घडले. त्यांनी समाजमन तयार केले. त्यातून सामाजिक समतेचा विचार पेरला गेला. अशा काही निवडक विचारवंत, लेखकांपैकीच डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर सर आहेत.

डॉ. लुलेकर सरांचा जन्म जालना जिल्ह्यातील सुखापुरी या गावी झाला. गावगाड्यातील कुशल तंत्रज्ञ असणार्‍या बारा-बलुतेदारांच्या सामाजिक पर्यावरणात ते वाढले. तत्कालीन ग्रामीण लोकजीवनातील अडी-अडचणी त्यांच्याही वाट्याला आल्या. त्याची तक्रार न करता ते शिकत राहिले. अंबड परिसरातच त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. पदवीसाठी त्यांनी मानवतच्या के. के. एम. महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच महाविद्यालयात पदवी मिळवली आणि पुढील शिक्षणासाठी ते नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात गेले. तिथे त्यांनी लक्षवेधक शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. एम . ए . ( मराठी ) परीक्षेत विशेष यश संपादन करून ते विद्यापीठातून प्रथम श्रेणीत सर्वद्वितीय आले.

काही काळ अंबडच्या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. तिथून त्यांचा सुरू झालेला वैचारिक प्रवास चढता राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते प्रशासकीय अधिकारी पदावर विराजमान झाले. मग उपकुलसचिव, प्रभारी कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, मराठी विभागप्रमुख अशा अत्यंत महत्त्वाच्या अध्यापकीय आणि प्रशासकीय पदांवर सरांनी काम केले. त्यांनी मराठवाड्यातील दलित आत्मकथनांवर पीएच. डी. केली. हे करत असताना त्यांच्यातला समाजभान जपणारा माणूस कायम जागृत राहिला. या पदाच्या कार्यपद्धतीतून त्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली. यासाठी त्यांनी लेखणी आणि वाणीचा माध्यम म्हणून वापर केला. इथेच त्यांचा खर्‍या अर्थाने ‘प्रतिभेचा प्रदेश’ विस्तारला. अनेकांच्या साहित्याचा ‘वेध’ त्यांनी ‘वेधक’पणे घेतला. त्यात त्यांनी ‘भंजनाचे’ ‘भजन’ही गायिले.

लोकजीवनातील संस्कृतीचे ‘संचित’ हाच काळाचा इतिहास असतो. म्हणून ते संचित जतन व्हावं, यासाठी ‘साहित्याचे सांस्कृतिक संचित’ त्यांनी आपल्या लेखणीतून जतन करून समाजाच्या हवाली केलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील साठोत्तरी साहित्याचे प्रवाहही नोंदवले आहेत.

लुलेकर सरांचा आणि माझा तसा परिचय वीस वर्षांचा. अधूनमधून सरांशी भेट व्हायची. त्यांच्या व्याख्यानाला जावं वाटायचं. कारण फार जागतिक आणि आगतिकही ते व्याख्यान नसायचं. आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होताना ते मुद्देसुदपणे विचार मांडायचे. त्या मांडण्यात ठळकपणे ‘समतेचा’ सूर असायचा. या सुराला ‘भूमिके’ची ठाम निष्ठा होती. त्यामुळे त्यांची व्याख्यानं पुन्हा पुन्हा ऐकावी वाटायची. कारण सबलाचं होणारं संघटन हे दुर्बलांवर अन्याय करणारं असतं. त्यातून सामाजिक न्यायाचा बळी जातो, ही त्यांना सतावणारी चिंता ते व्यक्त करायचे. जात जाणिवांच्या संघर्षात लोकतांत्रिक लाभांची होणारी होळी त्यांना सहन होत नव्हती. त्यांनी अनेक ठिकाणी यासंबंधाने विचार व्यक्त केले.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी सरांनी लिहिलेल्या ‘गावगाड्याचे शिल्पकार’ या पुस्तकातील त्यांची भूमिका आजचे महाराष्ट्रातील ढवळून निघणारे अस्वस्थ वर्तमान सांगणारे आहे. अत्यंत तळमळीने सरांनी लिहिलेली भूमिका आजच्या तमाम महाराष्ट्रातील गोरगरिबांना भेडसावणारी सामाजिक स्थिती आहे. काळाच्या पुढे पहाण्याची त्यांची दृष्टी विचारणीय आहे. त्यात त्यांनी बदलत्या आधुनिकरणात कधीकाळी सृष्टीतील माणसांचं जगणं सोपं करणारा ‘बलुतेदार’ रोजगाराच्या दृष्टीने कमजोर झाला. कालचा ‘इंजिनिअर’ असणारा बलुतेदार आज आपले अस्तित्त्व गमावून रोजगारासाठी भटकंती करतो आहे, याची जाणीव सरांनी संशोधनातून सर्वांना करून दिली आहे.

जगाच्या इतिहासात सामाजिक सुधारणाच्या काळात कार्ल मार्क्स ‘थेअरी’ मांडत असताना त्यांच्या समकालीन असणारे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले हे ‘प्रॅक्टीकल’ करत होते. त्यामुळे भारतीय समाजजीवन आरपार ढवळले. हेच त्यांचे कार्य गोरगरिबांच्या अंगणात नेऊन ठेवण्याचं काम लुलेकर सरांनी प्रामाणिकपणे केले आहे. जोतिबांनी केलेल्या समतेच्या बीजारोपणाचा विस्तार व्हावा यासाठी सरांनी समाज मनाच्या शेतीत विचाराचा नांगर धरला. म. फुलेंच्या साहित्यावर आपले मूलगामी चिंतन मांडले आहे. यातून समतेचा उजेड देताना त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षांच्या स्वप्नांचे ‘ढग’ आलेही अन् गेलेही हे सांगितले. त्यांनी एकूणच परिवर्तनाच्या विचारांचा हातात ‘मोगडा’ धरला अन् समाजमनाची परिवर्तनवादी मशागत केली. त्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक गावात फुल्यांच्या सामाजिक समतेची ‘खतपेरणी’ झाली. त्यातून चळवळीच्या रानात ‘मोड’ धरलेले अनेक नव्या पिढीतील लेखक, समीक्षक तयार झाली. त्यांच्या ओबडधोबड लेखणीला आपल्या अनुभवाचा ‘रंधा’ सर मारत राहिले. त्यामुळे तेच लेखन वाचकांना जवळ करत राहिले.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले त्यास तोड नाही. काळाच्या मर्यादा ओलांडून धाडसाने पाऊल टाकणार्‍या सावित्रीबाई आहेत. त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर सैद्धांतिक विश्लेषण लुलेकर सर व्याख्यानात करत आले. जोतीराव आणि सावित्रीबाई यांच्या कार्याने प्रज्वलीत झालेल्या ज्ञानाच्या प्रकाश किरणांना आपल्या परीने बहुजनांच्या दारात नेण्याचे काम लुलेकर सरांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या सामाजिक जीवनात अमूलाग्र क्रांती घडवून आणली; पण त्यांचे कार्य मर्यादित करण्यासाठी त्यांना ‘दलितांचेच उद्धारक’ अशी उपाधी लावल्या गेली. मात्र बाबासाहेबांचे कार्य हे एकूणच देशहित, सामाजिक समतेसाठी होते. ते राष्ट्रनिर्माते होते. परंतु त्यांच्याकडे जातीय मानसिकतेतून पहाण्यात आले. त्यांना दलितांपुरतेच मर्यादित ठेवण्याचे षडयंत्र बर्‍याच दिवसांपासून सुरू होते. परंतु संविधानाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या जगण्यात ज्या संविधानिक सवलतीचा लाभ झाला, त्याचे मोल अनमोल आहे. हे लुलेकर सरांनी ‘अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा : दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथातून सांगितले. देशाच्या उद्धारासाठी बाबासाहेबांचे भरीव योगदान कसे आहे, हे समप्रमाण मांडले. संकुचितपणे आंबेडकरी विचाराकडे पहाणार्‍या इतर मागासवर्गीय घटकाला या पुस्तकातून नवी दृष्टी मिळाली आहे. आजच्या सामाजिक संक्रमणाच्या काळात सरांचे हे पुस्तक एकूणच समाजाच्या मनातली जळमटं जाळून सामाजिक समतेचा नवा विचार देणारे आहे. या पुस्तकातील विचार देशभर पोहोचावेत, यासाठी सुप्रसिद्ध अनुवादक डॉ. सूर्यनारायण रणसुभे सरांनी या ग्रंथाचा हिंदीत अनुवाद केला आहे.

डॉ. लुलेकर सरांनी आजवर अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. वेगवेगळ्या परिसंवादातून त्यांनी आपले विचार मांडले. यासाठी त्यांनी अनेकदा रोषही पत्करला. जाहीरपणे आपले विचार मांडताना विवेकाला जागृत ठेवले. मात्र भूमिका कधी दुटप्पी घेतली नाही. सामाजिक ‘समता’ हाच त्यांच्या एकूणच विचारकृतीचा ध्यास राहिला आहे. सरांना राज्य शासनासह अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव वेगवेगळ्या पुरस्कारातून केला आहे. त्यांचे कार्य दखल घेण्यासारखेच आहे.

डॉ. लुलेकर सरांनी साहित्यातील अनेक प्रकार हाताळले. त्यात विशेष म्हणजे समीक्षा आणि वैचारिक लेखन मोठ्या प्रमाणात केले आहे. यासोबत शेकडो पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यात तटस्थपणे आपले मते त्यांनी नोंदवली आहेत. त्यामुळे नव्याने लिहिणार्‍या लेखकांना दिशा मिळाली आहे.
विद्यापीठीय ढाच्यापेक्षा लोकजीवनाची नाळ लक्षात घेऊन त्यांनी लेखन केले आहे. संदर्भाचा भडीमार करणार्‍या विद्यापीठीय संशोधन पद्धतीला थोडे दूर ठेवून आपले स्वतंत्र मतं त्यांनी नोंदवली. त्यामुळे त्यांची लेखनशैली वाचकांना जवळची वाटली.
सरांचे, आले ढग… गेले ढग, बलुतेदार, गावगाड्याचे शिल्पकार, बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे, मोगडा, अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा : दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा जोतीराव फुले, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वेध आणि वेधक, प्रतिभेचे प्रदेश, पंचधारांचा प्रदेश, साहित्याचे सांस्कृतिक संचित, साहित्याचे वर्तन आणि वर्तमान, भंजनाचे भजन, साठोत्तरी साहित्य प्रवाह- भाग १, साठोत्तरी साहित्य प्रवाह-भाग २, भूमिकांचा ऐवज, मराठवाड्यातील मराठी वाङ्मयाचा इतिहास, मराठी व्याकरण आणि लेखन, अनिवार्य मराठी : व्याकरण, लेखन आणि आकलन, ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
यासोबतच काही महत्त्वाच्या निवडक पुस्तकांचेही सरांनी संपादन केले आहे. त्यातूनही त्यांनी आपले समाजचिंतन मांडले आहे. मुक्ता साळवे यांचा ‘मांग-महारांच्या दु:खाविषयी निबंध, समग्र वाङ्मय : सावित्रीबाई फुले’ या पुस्तकांची विशेष नोंद घ्यावी लागेल.

आजवरच्या प्रवासात सरांनी लेखनातील सातत्य कायम जपलं आहे. यापुढेही त्यांच्या वाणी, लेखणीतून ‘फुले, सावित्री, मुक्ता, शाहू, आंबेडकर’ या विचाराची ‘पंचधारा’ मराठीच्या ‘प्रदेशात’ सतत वाहत राहो, ही माफक अपेक्षा!

वैजनाथ वाघमारे
शब्दवेध बुक हाऊस (प्रकाशन)
छत्रपती संभाजीनगर
मो- ८६३७७८५९६३ / ७७५८९४१६२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *