कंधार;
२० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत पानभोसी येथील ग्रामस्थांनी मला भरभरून प्रेम दिले. गावासाठी जेवढे शक्य होते, ते मी केले. परंतू आता कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे राजकारणात अधिकचा वेळ देणे शक्य होत नाही. यामुळे मी पुढील काळात राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय केला आहे. यापुढे राजकारणात सक्रिय सहभाग घेणार नसलो तरी समाजकारण मात्र करीत राहणार असल्याचे पानभोसीचे सरपंच तथा नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना राजेंद्र भोसीकर म्हणाले की, आमचे बाबा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पानभोसीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केला. राजकारणातून अलिप्त होण्याचा निर्णय दुःखद असला तरी तो घ्यावा लागला. राजकारणात नसलो तरी मी येथील ग्रामस्थांच्या सुखदुःखात नेहमीच राहणार आहे. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राजकारणात असायलाच हवे, असे नाही. समाजकारणाच्या माध्यमातूनही लोकांची सेवा करण्यास भरपूर वाव आहे. भोसीकर कुटुंबाने आजपर्यंत राजकारणा पेक्षा समाजकारणालाच महत्व दिल्याचेही त्यांनी म्हटले.
आपल्या कामाचा आढावा घेताना ते म्हणाले की, गावकऱ्यांनी १५ ते २० वर्ष मला सरपंच, उपसरपंच, सदस्य म्हणून संधी दिली. त्याच बरोबर १० वर्ष सेवा सोसायटीचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधीही दिली. याकाळात मी गावकऱ्यावर कोणतेही संकट येऊ दिले नाही. माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भाषिकर, वर्षा भोसीकर आणि जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्या सहकाऱ्याने गावात अनेक विकास कामे केली. अंतर्गत रस्ते, नाल्या, डिजिटल शाळा, जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्याप्रमात करून घेतली. तत्कालीन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून धावरी ते कलंबर रस्त्यावरील पवनेदोन कोटींचा पूल करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
गावातील विविध विकास कामांची पाहणी करून तत्कालीन जिल्हाधिकारी काकाणी, तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी चांगली कामे केल्याबद्दल शुभेच्याही दिल्या. गेल्यावर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मी गावातील ११० नागरिकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून ३०० लोकांना मोफत चष्म्याचे वाटप केले. त्यांना येण्या-जाण्यासाठी वाहणाचीही व्यवस्था केली. त्यांना मोफत औषध उपलब्ध करून दिली असे स्पष्ट करून त्यांनी राजकारणात न राहताही हे सर्व करण्याचा माझा संकल्प आहे. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, मात्र पानभोसीच्या नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच मी कार्य करीत राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.