जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांकडे प्रगत माध्यमे नाहीत, त्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणू – शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड


#नांदेड ;


  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. इंटरनेट, मोबाईल, दुरदर्शन, आकाशवाणी,       यु-टयूब, व्हॉटसप या माध्यमांचा वापर आता ग्रामीण भागातही शिक्षक आणि विद्यार्थी अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे यासुविधा उपलब्ध नाहीत असा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात असून जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यत शिक्षण पोहचावे यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, सर्वश्री आमदार अमर राजूरकर, भिमराव केराम, राजेश पवार, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, शिक्षण सभापती संजय बेळगे व माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगिर व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 


ग्रामीण भागात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. या परिस्थितीत शाळा सुरु करणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये विविध सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी, सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाचे निकष पाळून मोकळ्या जागेत आपआपल्या भागातील मुलांना शिकविण्याचे प्रयोग सुरु केले आहेत. या धर्तीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून जर कुठे कोणी प्रयत्न करत असेल तर त्यातील उदात्त दृष्टिकोण आपण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात जिथे इंटरनेटची सुविधा नसेल तेथे शिक्षणमित्र व विद्यार्थीमित्र तयार करुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट करत शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहता कामा नये याची नियोजन शिक्षण विभागाने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 


जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अनुषंगाने आमदार अमर राजूरकर, आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी विविध अडचणी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा एकत्रित आढावा माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगिर व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उपस्थितांसमोर मांडला. #Varshagailwad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *