इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचा गलथान कारभार
शिक्षकांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
मुखेड:भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) ची रक्कम मंजूर होऊनही अद्याप खात्यावर वर्ग न केल्यामुळे 17 सप्टेंबर रोजी शिक्षकांनी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय अधिनस्त असलेले शिक्षक व कर्मचारी गेल्या नऊ महिन्यापासून प्रादेशिक उपसंचालक कार्यालय लातूर येथून मंजूर होऊन आलेले जीपीएफ प्रस्ताव व रक्कम अद्याप आदा न केल्यामुळे आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांच्या मुलीचे लग्न सदरील रकमेअभावी रखडले असून काहींचे लग्न मोडण्याच्या मार्गावर आहेत.
सदरील जीपीएफ ची रक्कम तात्काळ शिक्षकांच्या खात्यावर आदा न केल्यास येत्या 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर सूर्यतळी डी. एम., संगेकार एम.एम., पाटील व्ही.जी., जाधव एम. के., जाधव एम.जी. यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.