साठे महाविद्यालयात रंगले कथाकथन
मुखेड:
वाचन, लेखन आणि संवाद यातून व्यक्तीच्या भाषिक कौशल्याचा विकास होतो. हेच भाषिक कौशल्य माणसाचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उपयोगाला येत असते. विद्यार्थ्यांनी ही भाषिक कौशल्य नीट नेटकेपणाने, कृतीशीलतेतून आत्मसात केली तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास नक्कीच होतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार सौ. अनुपमा बन यांनी केले.
येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “कथाकथन” कार्यक्रमात कथाकथन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अभ्यासू प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. संजीव डोईबळे, पर्यवेक्षक हेमंत घाटे, मराठी विभाग प्रमुख डॉ. राम धारासूरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मोमीन काझी, यांची प्रमुख उपस्थिती होती.सौ.अनुपमा बन कथाकथन करताना पुढे म्हणाल्या की, नाटक आणि कथाकथन यात संवादाला महत्त्व असते. भाषा लवचिक असते, ती आपल्याला आपल्या देहबोलीप्रमाणे वापरता आली पाहिजे. स्पष्ट उच्चार, बोलीतील शब्द, आवाजाची लकब, शब्दांचे चढ उतार इत्यादी बाबी सुरुवातीला शिकाव्या लागतात. सरावाने त्या आपल्या भाषेत वापराव्या लागतात. त्यातूनच आपल्याला भाषेचे सुंदर स्वरूप वापरता येते आणि आपला संवाद प्रभावी होत असतो, असे मार्गदर्शन करून त्यांनी स्वलिखित “बालमन” आणि “क्रांती” या दोन कथांचे सादरीकरण केले.
याप्रसंगी श्रोते मंत्रमुग्ध होऊन कथा ऐकत होते. कथाकथन ऐकताना विद्यार्थी वर्ग भावकल्लोळ झाले होते. हास्य, टाळ्या व गंभीरता यांची मांडणी कथाकार सौ.अनुपमा बन यांनी कथेतून केली. त्यांच्या प्रभावी कथा सादरीकरणामुळे कार्यक्रमात रंगत आली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.मनोहर तोटरे यांनी मराठी विभागाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्ये आणि अभिनयाचे मार्गदर्शन घ्यावे व विविध स्पर्धेतून सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राम धारासूरकर यांनी केले तर स्वागतगीत प्रा. सौ. सरिता पुरी व संचाने सादर केले. कथाकथनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. केशव पाटील यांनी केले तर आभार प्रा. बसवेश्वर स्वामी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राम जमजाळ, प्रकाश राठोड, तुकाराम धोत्रे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.