फुलवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन

कंधार:प्रतिनिधी

जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने भारताचे माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे हस्ते व राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मा. ना.मंगल प्रभात लोढा यांचे उपस्थितीत मुंबई येथे राज्यातील ४३४ आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे ऑनलाइन पद्धतीने दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोज रविवारी लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून फुलवळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड यांचे हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

फुलवळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कंधार येथिल संविधान मंदिराचे उद्घाटन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिल्प निदेशक एस. एस.कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा बंजारा / लमान तांडा वस्ती सुधार योजनेचे अशासकीय सदस्य भगवान राठोड, भाजपा विस्तारक अड. गंगाप्रसाद येन्नावार अड. सागर डोंगरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रारंभी “संविधान मंदिराचे” उद्घाटन करण्यात येऊन संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पहारणे स्वागत करण्यात आले, तदनंतर “भारताचे संविधान”उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

भारतीय संविधान मंदिराचे उद्घाटन निमित्त फुलवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी निबंध स्पर्धा,भाषण स्पर्धा, प्रश्न मंजुषा, वृत्तपत्र लेखन, संविधान प्रश्नावली, रांगोळी स्पर्धा यासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रसंगी भगवानराव राठोड, गंगाप्रसाद यन्नावार,एस.एस.कांबळे सर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून देण्याविषयी मार्गदर्शन केले. भगवान राठोड हे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, सामाजिक न्यायाची खरी शिकवण भारतीय राज्यघटनेनुसार प्राप्त झाली असून, भारताची राज्यघटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली अशा महामानवास त्यांनी प्रथम अभिवादन केले व पुढे म्हणाले कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या अंतर्गत कार्यरत सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिकवण प्रभावीपणे देण्यासाठी संबंधित विभागाने “संविधान मंदिर स्थापना” करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या सोहळा प्रसंगी उद्घाटन करण्याचा मान माझ्यासारख्या तांडा वस्तीवर राहणाऱ्या गरीब कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला मिळाला हे माझे भाग्य आहे,ते केवळ राज्यघटनेमुळेच शक्य झाले,असे उपस्थित विद्यार्थ्यांसमोर बोलून दाखवले.

गंगाप्रसाद यन्नावार आपल्या मनोगत म्हणाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे निर्माण म्हणजे एक ऊर्जास्त्रोत असून या ऊर्जा स्त्रोताच्या आधारे देशाचे भविष्य घडवणारे विद्यार्थी यांना सदैव प्रेरणा देणारे असून या ऊर्जा स्त्रोतामुळे देशाचे भवितव्य ही वृद्धिगत होईल असे ते म्हणाले.

या कार्यक्रम प्रसंगी शिल्प निदेशक अंगद उन्हाळे, कुमारी नगराळे, डी. टी. घुमे, पारवेकर, गेडेवार, नामेवार, गडपल्लेवार, राखे, बोईनवाड,श्रीमंगले, रवी राव, लांडगे यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अडाणी सर यांनी केले तर सूत्रसंचालन बोईनवाड यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार पी.एन. तायडे यांनी मांनले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *