नांदेड, दि. १८ सप्टेंबर २०२४:
नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे मंजूर करण्यात आला असून, सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात ही बाब नमूद आहे.
खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुमारे १०४ किलोमीटर लांबीच्या नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम ‘महारेल’च्या माध्यमातून प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचारार्थ पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार सध्या फायनल लोकेशन सर्व्हे सुरु असून, त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
सुमारे २ हजार २५४ कोटी रुपयांच्या नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी निर्धारित खर्चासह तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झालेला आहे. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारकडून मोफत जमीन तसेच बांधकामाचा ५० टक्के खर्च वाटून घेण्यासाठी संमती केंद्राकडे प्राप्त झाली आहे. मात्र, कर्नाटक सरकारची संमती अद्यापही प्रलंबित असल्याचे रेल्वे मंत्रालयाने खा. अशोकराव चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.