नांदेड – जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळा बंद शिक्षण चालू हा उपक्रम सुरू असून कोव्हिड काळात शाळांतील शिक्षकांच्या उपस्थितीतीबाबत शिक्षण विभागातील विविध स्तरांतील अधिकारी वेगवेगळ्या आणि मनमानी सूचना देत असल्याबाबत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे लक्ष वेधले असता लवकरच यांतील संभ्रम दूर करु असे आश्वासन ना. गायकवाड यांनी शिक्षकसेनेला दिले. यावेळी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने कोव्हिड काळात सुरू असलेल्या आॅनलाईन शिक्षण पद्धतीतील त्रुटींबाबत चर्चा केली.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ह्या आॅनलाईन शिक्षणाबाबत आढावा बैठकीसाठी जिल्हापरिषदेत आल्या होत्या. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, सरचिटणीस रविंद्र बंडेवार, उपाध्यक्ष गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील आॅनलाईन आणि आॅफलाईन शिक्षण, इंग्रजी शाळांचा मनमानी कारभार, राज्यशासनाने विद्यार्थ्यांना स्मार्टफोन पुरविणे, तसेच कोव्हिड काळात शाळांतील शिक्षकांची उपस्थिती, विविध संवर्गात असलेली रिक्त पदे, वरिष्ठ वेतनश्रेणी, शिक्षण विभागातील प्रभारी राज, कोव्हिड कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांची कार्यमुक्तता आदी विषयांवर श्री. अंबुलगेकर यांनी चर्चा केली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या शाळा बंद, शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत. विविध माध्यमांतून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. शिक्षक स्वखर्चाने स्वाध्यायपुसृतिकांची निर्मिती करुन विद्यार्थ्यांना वाटप करीत आहेत. त्याद्वारे स्वयंअध्ययनाचा आढावा घेतला जात आहे.
परंतु शिक्षण विभागातील काही अधिकारी तोंडी सूचना देऊन सर्व शिक्षक उपस्थित राहा, ५०% उपस्थित राहा, तुम्ही तुमच्या नियोजनाप्रमाणे उपस्थित राहा असे सांगत आहेत. जिल्ह्यात दररोज रुग्णबाधितांची त्रिशतकी खेळी करणाऱ्या परिस्थितीत अधिकाऱ्यांना दुरुनच शाळा बंद असेल किंवा कुणी जाणिवपूर्वक तक्रार केली असेल तर मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येत आहे. काही कारणास्तव इतर शिक्षक अनुपस्थित राहिल्यास त्यांना खुलास मागत आहेत. एवढेच नव्हे तर एकदिवसाचा पगार बंद करण्याच्या, वेतनवाढ रोखण्याच्या धमक्या देत आहेत.
ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही अथवा टीव्ही नाही अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना गृहभेटी देण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहेत. त्यात मास्क काढून विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या आणि व्हाटसप ग्रुपवर पाठवण्याच्याही सूचना दिल्या जात आहेत.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारकाळात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वैयक्तिक मार्गदर्शन करताना,शासनाच्या शिक्षक उपस्थितीबाबत स्पष्ट सूचना असताना शाळेत सर्व शिक्षकांची उपस्थिती ठेवण्याच्या आडदांड पर्यायांमुळे शिक्षकांत संभ्रम असून महिला शिक्षकांना गैरसोयीच्या दिलेल्या सूचनांमुळे त्यांना नाहक मानसिक त्रास होत आहे,
अशी तक्रार काही महिला शिक्षक भगिनींनी केली आहे. यांमुळे चांगले काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये निराशेची भावना निर्माण होत आहे. यासंदर्भात आपण शिक्षक उपस्थितीतीबाबत आपल्यास्तरांवरुन विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.
याबरोबरच विविध संवर्गातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे, मूळ रिक्त पदे भरुन गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख या प्रभारी पदांवरचा असलेला भार कमी करावा, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट वेतनश्रेणी द्यावी, आॅनलाईन शिक्षणाबाबत लक्ष देता येत नसल्यामुळे कोव्हिड – १९ काळात अजूनही कर्तव्यावर असलेले शिक्षकांना कार्यमुक्त करावे अशा मागण्या ना. गायकवाड यांच्याकडे शिक्षक सेनेने दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.