नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी विधानसभेसाठी 4 अर्ज दाखल

 

* 9 विधानसभेसाठी एकूण 441 तर लोकसभेसाठी 28 अर्जाची उचल

* लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज एकाही उमेदवाराचा अर्ज नाही

नांदेड दि. 23 ऑक्टोंबर :- जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात बुधवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी 4 अर्ज दाखल केले आहेत. भोकर येथे एकाच उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले आहेत. नऊ मतदारसंघात 253 इच्छूक अर्जदारांनी 441 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी 17 इच्छुकांनी 28 अर्जाची उचल केली आहे. काल बुधवारी जिल्ह्यामध्ये 411 अर्जांची उचल करण्यात आली होती. तथापि काल विधानसभेसाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. आज मात्र 4 अर्ज दाखल झाले आहेत.

विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, लोहा, किनवट, हदगाव, देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड उत्तर मतदारसघात 41 उमेदवारांनी 67 अर्ज नेले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात 61 इच्छूकांनी 69 अर्जाची उचल केली आहे. लोहा मतदारसंघात 7 इच्छूकांनी 17 अर्ज, किनवट मतदार संघात 16 इच्छूकांनी 44 अर्ज, हदगाव मतदारसंघात 35 इच्छूकांनी 72 अर्ज, नांदेड दक्षिण मतदार संघात 21 इच्छूकांनी 31 अर्ज, देगलूर मतदारसंघात 17 इच्छूकांनी 39 अर्ज, मुखेड विधानसभा मतदारसंघात 17 इच्छूकांनी 38 अर्ज आणि नायगाव मतदारसंघात 38 इच्छूकांनी 64 अर्ज घेतले आहेत. दुसऱ्या दिवशी किनवट 1, भोकर 2, नांदेड उत्तर 1 या तीन मतदार संघातील इच्छूकांनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली आहे.

अर्ज दाखल करणारे उमेदवार

नांदेड उत्तरमध्ये अकबर अख्तर खान यांनी एक अर्ज दाखल केला. किनवटमध्ये अर्जुन किशन आडे यांनी एक तर भोकरमध्ये अब्दुल वाहिद मोहमद यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत.

आज लोकसभेसाठी एकही अर्ज दाखल नाही

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. आज 17 अर्जदार व्यक्तींनी जवळपास 28 अर्जाची उचल केली आहे.

#विधानसभानिवडणूक२०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *