*कंधार प्रतिनिधी – संतोष कांबळे*
नांदेड जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
माजी खासदार प्रतापराव पाटील – चिखलीकर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांचे लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून नावाची घोषणा करण्यात आली. शिवाय एबी फॉर्मही राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी त्यांचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली आहे. चिखलीकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडेच घेतला जाऊन चिखलीकर यांना सहजपणे उमेदवारी मिळेल असा सर्वांचाच कयास होता. मात्र महायुतीच्या जागा वाटपात लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेला. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रतापराव चिखलीकर यांच्या उमेदवारीबाबत एक प्रकारची कोंडी निर्माण झाली. हीच कोंडी सोडविण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरील सर्व नेत्यांनी चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणुकीत उतरविण्याचे निश्चित केल्याचे समजते. त्यानुसार चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांची उमेदवारीही जाहीर झाली आहे. यावेळी प्रविण पाटील चिखलीकर, गणेश पाटील सावळे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास करत चिखलीकर यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस प्रतिनिधित्व देखील केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा-कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
मतदारसंघात त्यांनी तयारी देखील सुरु केली होती. हा मतदारसंघ भाजपाला सुटेल अशी शक्यता होती, मात्र ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला सुटली आहे. तेव्हा माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने भाजपला धक्का बसला असून नांदेडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.