अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील जेष्ठ विचारवंत आणि गांधीवादी कार्यकर्ते श्री मच्छिंद्र गोजमे लिखित आणि शब्दवेद बुक हाऊस संभाजी नगर निर्मित राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच श्री ज्ञानेश्वर महाराज बंडगर आणि प्रा सुभाष वारे यांच्या हस्ते करण्यात आले.
संवैधानीक राष्ट्रवाद मंचच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे होते. संविधान प्रसार चळवळीचे नेते प्रा सुभाष वारे हे अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावर मंचाचे संस्थापक प्रशांत कोठडिया, संयोजक विवेक काशिकर, संपादक निलम पंडित, विद्यालंकार घारपुरे, विक्रम शिंदे, रविंद्र माळवदकर, प्रसाद झावरे, मच्छिंद्र गोजमे, अरुणा तिवारी आणि रामदास मारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात प्रा सुभाष वारे यांनी संविधानाची निर्मिती करताना महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि जगभरातील राजकीय चळवळीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सदस्यांनी सखोल अभ्यास केला. भारतीय मातीतून निर्माण झालेल्या वैश्विक प्रागतिक विचार आणि मानवी मुल्यांचा त्यामध्ये समावेश केल्यामुळे आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था टिकू शकली असे सांगितले. श्री प्रशांत कैठडिया यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती तमन्ना इनामदार यांनी आभार मानले.