छ. संभाजीनगर (प्रतिनिधी )
त्रैमासिक तिफण हे कन्नड सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून गेली पंधरा वर्ष सातत्याने प्रसिद्ध होत आहे. तिफणच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील नवोदित लेखक , कविंना व्यासपीठ मिळाले. अनेक नाविण्यपूर्ण वाङ्मयीन उपक्रम तिफणच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असतात. तिफण केवळ आता एक मासिक राहिले नसून ती एक वाङ्ममयीन चळवळ झाली आहे. चर्चासत्रे, कविता महोत्सव, तिफण पुरस्कार, नवलेखक शिबिरे, साहित्य लेखन स्पर्धा,तिफण प्रकाशन, तिफण डिजिटल, तिफण सखी मंच च्या माध्यमातून तिफणने महाराष्ट्राच्या वाङ्मयीन चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी केले.
(ता. ३) त्रैमासिक तिफणच्या झाडीपट्टी रंगभूमी दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इसाप प्रकाशन नांदेडचे दत्ता डांगे, ग्रामीण कवी शंकर वाडेवाले, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. नवनाथ गोरे, तिफणचे संपादक डॉ. शिवाजी हुसे यांची उपस्थिती होती.
दत्ता डांगे म्हणाले की, तिफण हे उपेक्षितांचे व्यासपीठ असून तिफणने नाविन्यपूर्ण विषयावर विशेषांक प्रसिद्ध करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
कवी शंकर वाडेवाले म्हणाले की तिफण ने झाडीपट्टी रंगभूमी या दुर्लक्षित विषयाला न्याय दिला आहे. यापुढेही तिफण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणिय योगदान देईल असे मत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. सर्जेराव जिगे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. शिवाजी हुसे यांनी भूमिका मांडली. डॉ. नवनाथ गोरे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.