कंधारः- फुलवळ येथील त्या ८ कोरोना बाधित व्यक्तींच्या संर्पकात आलेल्या ३३ व्यक्तींना फुलवळ येथील कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केले होते. या कोविड सेंटरमध्येच त्या ३३ व्यक्तींचे स्वॅब दि.२२ जुलै घेतले असून ग्रामस्थांचे लक्ष आता वैद्यकीय अहवालाकडे लागले आहे. सदर व्यक्तींचे स्वॅब घेण्यासाठी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद फिसके, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश किलजे, डॉ.निलेंद्र वर्मा व लॕब टेक्निशियनसह वाहन चालक संभाजी मोकळे, पद्माकर राहेरे, दिपक फुलवळे या वैद्यकीय टीमने स्वॅब घेऊन या रोगाची मनामध्ये कसल्याच प्रकारची भिती न बाळगता कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराला लवकरच हद्दपार करण्यासाठी स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवा, वेळेवर जेवण करुन नियमितपणे साबणाने हात स्वच्छ धुवा, किमान ५ फुटाचे सामाजिक अंतर ठेवल्यास हा आजार कायमचा जाणार आहे, असा दिलासा वैद्यकीय टीमने दिला. त्यामुळे क्वॉरंटाईन असलेल्या सर्व व्यक्तींमध्ये वेगळा उत्साह दिसून आला. स्वॅब घेण्यात आलेल्या एकूण ३३ व्यक्ती असून यात १२ महिला तर २१ पुरुष यांचा समावेश आहे. कंधारचे प्रभारी तहसिलदार ताडेवार, दिग्रसचे मंडळ अधिकारी शेख, फुलवळचे मंडळ अधिकारी एस.एम.पटणे, कृषी सहाय्यक खाडे यांनी फुलवळ कोविड सेंटरला भेट देऊन क्वॉरंटाईन व्यक्तींसोबत चर्चा करुन त्यांना दिलासा दिला. आता त्या व्यक्तींचा कोरोना विषाणू अहवाल कसा येणार ? याची फुलवळ वासियांनी धडकी घेतली आहे. अगोदरच फुलवळमध्ये कोरोना बाधितांची संख्या ११ वर पोहचली, त्यातील एका कोरोना बाधिताचा गुरुवार दि.१६ जुलै रोजी मत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.