नांदेड ; *आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा ऐकण्याची नांदेडकरांना पुन्हा एकदा संधी मिळणार असून दि. १९ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यानची तारीख नांदेडसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.*
पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेच्या गर्दीचे नवीन नवीन विक्रम होत आहेत. या आठवड्यात दुबई येथे झालेल्या कथेला अनिवासी भारतीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.सप्टेंबर महिन्यात नांदेड येथे झालेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेसाठी पाच लाख पेक्षा जास्त जनसागर जमला होता. दोन दिवस पाऊस पडल्यामुळे कथेमध्ये व्यत्यय आला होता. तेव्हापासून दिलीप ठाकूर हे नांदेड येथे आणखी एकदा आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु वर्ष २०२९ पर्यंतच्या सर्व तारखा आधीच आरक्षित झालेल्या होत्या. दिलीप ठाकूर हे स्वतः दोन वेळा सिहोर येथे कथेच्या आयोजनासाठी गेले होते. शेवटी त्यांच्या आग्रहानुसार २०२६ ची तारीख मिळालेली आहे. सात दिवस नांदेडमध्ये होणारी शिव महापुराण कथा अभूतपूर्व होण्यासाठी एक हजार सक्रीय सदस्य बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच एक व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.