मन्याड खोऱ्यातला पराक्रमी प्रताप : खा. प्रताप पाटील चिखलीकर
मन्याड खोऱ्याच्या मातीत निपजलेला आणि त्याच मातीत बेदरकार वाढलेला एकच ढाण्या वाघ म्हणजे लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला, कार्यकर्त्यांना पोटच्या लेकरांप्रमाणे जपणारा, बलाढ्य शत्रूशी झुंज देणारा, कडवी टक्कर देणारा, प्रसंगी आक्रमक होऊन विरोधकांची शिकार करणारा मन्याडचा वाघ म्हणून निवडणूकीच्या राजगादीवरील अनभिषिक्त सम्राट ठरला. असा पराक्रमी योद्धा म्हणजेच खा. प्रताप पाटील चिखलीकर साहेब! याची खरी प्रचिती आली ती २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत. लोहा कंधार या मतदारसंघात बलाढ्य उमेदवारांना अस्मान दाखवित प्रचंड मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवला. या अत्यंत विलक्षण प्रसंगाचे विरोधकांसह सर्वच मतदार साक्षीदार आहेत. एवढेच नव्हे तर प्रतापरावांच्या प्रतापाचा मतदारसंघाच्याबाहेर प्रसारमाध्यमांनी अशी दखल घेतली की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आकाशातील स्वयंप्रकाशित तारा म्हणून सतत चमकत राहावा! या निवडणुकीत मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे विरोधकांना जोरदार हादरा बसला. तब्बल ४५,४८६ मतांची आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळवित लोहा कंधार मतदारसंघाचे १९५२ पासूनचे सर्व रेकॉर्ड तोडले. अनेकांचे डिपाॅझिट जप्त करीत विक्रमी मतांनी विरोधकांना पाणी पाजले. या मतदारसंघातील जनतेनेही आपला मन्याडी हिसका दाखवित सन २००९ मध्ये केलेली आपली चूक सुधारुन घेतली. मन्याडच्या वाघाची शिकार करण्यासाठी कोल्ह्या-कुत्र्यांची एकमूठ बांधण्यात आली होती. त्याला त्यावेळी जनतेचीही साथ होती. त्याची पुनरावृत्ती नगरपरिषदेतही झाली. मात्र आता दलित मुस्लिमांसह इतर बहुजन समाजही भक्कम पाठिंब्याने प्रतापरावांच्या पाठीशी उभा राहिला. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मतदार संघात शिवसेनेची प्रतिष्ठा आणखीनच वाढली. भगवं वादळ नव्यानं घोंघावू लागलं. अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते शिवसेनेत गेले तरीही कायम विरोधात असलेला बौद्ध व मुस्लिम समाज त्यांच्या सोबत राहिला, एकनिष्ठ राहिला हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य! सन २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत जेव्हा पराभव झाला तेव्हा त्यांची ही एकाकी झुंज होती. पराभव झाला तरी हार मानली नाही. ते धुरंधर राजकारणी आहेत. अपयशाला नेहमी ते पायाखाली तुडवितात. ते या काळात कार्यकर्त्यांत राहिले, जनतेत राहिले, जनसेवेत राहिले. विवाह सोहळे, रक्तदान शिबिरे यातून थेट समाजकार्याशी जोडले गेले. मतदारांच्या अडीअडचणींना जाणून घेतले. त्या सोडविण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेतला. लोकांचे वैयक्तिक आणि मतदारसंघाचे सामुहिक प्रश्न सोडविले. अनेकांचे प्रश्न तर एक फोन करूनच सोडविले. म्हणून या मतदारसंघातला हरेक मतदार इथे प्रताप पाटीलच पाहिजे असे म्हणतो ते विरोधकांनी समजून घेण्यासारखे आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मतदारसंघात भगवी लाट निर्माण झाली. शिवसैनिकांत एकप्रकारचे चैतन्य निर्माण झाले. अनेक दिग्गज कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले. आजही ही त्यांची खासियत आहे. आधी विरोधात असलेले नंतर वरमतात. सोन्यासारख्या माणसाला आम्ही उगाचच त्यावेळी विरोध केला अशी उपरती त्यांना होते. मग ते प्रतापरावांच्या शामियान्यात दाखल होतात. आज कंधार आणि लोहा नगरपालिका, पंचायत समिती लोहा साहेबांच्याच ताब्यात आहेत. त्यांच्यात कार्यकर्ते निर्माण करण्याची, टिकवून ठेवण्याची प्रचंड ताकद आणि कार्यकर्त्यांना खेचण्याचे अस्सल लोहचुंबक त्यांच्याकडे असल्याचे लोक बोलतात. एखादा कार्यकर्ता त्यांना चिकटला की सहजासहजी निघत नाही. मी कधीही चिखलीकर साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिज्ञाच कार्यकर्ते घेतात! त्यांनी अठरापगड जातीतील कार्यकर्त्यांना घडवले. निवडून आणून महत्वाची पदं दिली. त्यामुळे ते कार्यकर्त्यांच्या मनात घर करून राहतात. मग कार्यकर्ते निवडणूक काळात जिवाचे रान करतात. दुष्काळजन्य परिस्थितीमध्येसुद्धा कंधार लोहा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब बहुजन जनतेचा विधानसभा निवडणुकीमध्ये ‘सुखी रोटी खायेंगे, लेकिन प्रतापरावकोही चुनकर लायेंगे…!’ असा नारा होता. तो तंतोतंत खरा ठरला. ते आमदार असोत, नसोत लोकांची रीघ मात्र घरी कार्यालयात नेहमीच असते, हे मी स्वत: अनुभवले आहे. सद्यस्थितीत कोरोनाकाळाने सगळ्याच मनसुब्यावर घाला घातला आहे, अन्यथा आजही त्यांचे घर, कार्यालय आणि त्यांचे व्यक्तित्व कार्यकर्त्यांच्या, प्रश्न घेऊन येणाऱ्या आणि प्रतापरावांकडे आशाळभूत नजरेने पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या गराड्याने उजळून निघाले असते.
जनता माझी;मी जनतेचा हे साहेबांच्या जगण्याचेच ब्रीद आहे. जनसामान्यांचे प्रेम मनापासून त्यांच्यावर आणि त्यांचे जनतेवर आणि तितकेच कार्यकर्त्यांवर आहे. कार्यकर्त्यांचे मन ओळखणे, त्यांच्या कामांना गती देणे, यातून कार्यकर्त्यांचे प्रबळ संघटन बांधणे, विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांची फौज उभी करणे, नवीन तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांना योग्य तो मानसन्मान मिळवून देणे, सन्मानाने वागविणे हे त्यांचे अंगभूत गुण आहेत. कुशल नेतृत्व, भक्कम आत्मविश्वास, अप्रतिम नियोजन, चिकाटी व जिद्द, प्रबळ संघटन नि वेधक दूरदृष्टी यामुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत. तळागाळातील सर्वच कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. त्यावेळी दिसून आलेली सामाजिक समरसता कधीही दिसून आली नव्हती. सरपंच पदापासून ते आमदारकी पर्यंत आणि आता नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून अनेक संवैधानिक पदे भूषवत आणि आपल्या कार्यकर्त्यांना नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत अनेक पदे मिळवून दिली. मित्रमंडळाची स्थापना करुन एक एक कार्यकर्ता जोडला. लोकभारतीकडून निवडणूका लढविल्या. या सर्व जबाबदाऱ्या पेलत असतांना राष्ट्रीय कार्यक्रम, संकटे आणि राष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार प्रसंगी जिल्ह्यात सर्वत्र भेटी देऊन व मेळावे घेऊन शांतता व सामंजस्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात झालेल्या भूकंप (१९९३), पुरग्रस्तांना वेळोवेळी मदत, जेवण, औषध, कपडे व आर्थिक मदत देण्यात पुढाकार घेतला त्यामुळेच त्यांची सामान्य व्यक्तीशी नाळ जुळल्या गेली. २००४ साली जेव्हा विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढविली तेव्हाही त्यांचा लक्षणीय विजय झाला होता. आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे त्यांनी केली. अनेक वर्षांपासून रखडलेला लिंबोटी प्रकल्प त्यांनीच पुर्णत्वास नेला आणि लिंबोटीचे शिल्पकार ठरले. त्याचबरोबर विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले. विरोधकांनी कंधार नगरपालिका निवडणुकीत ‘ज्याच्या पायाखाली सनी, त्याचा चिखलीकर धनी’ असा अपप्रचार केला. मात्र त्यांनी ढाण्या वाघ काय असतो ते दाखवून दिले. विरोधकांना चारीमुंड्या चित करुन धूळ चारली त्यानंतर जनताच म्हणू लागली की, ‘ज्याचं नाही कुणी त्याचा चिखलीकर धनी!’ जो पराभवाला डगमगत नाही तोच खरा वाघ असतो. कोणतेही काम तडीस नेण्याचा निर्धार केला की त्याचे यशस्वी परिणाम नक्कीच दिसू लागले पाहिजे असा त्यांचा बाणा आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर घेऊन चिखलीकर साहेबांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याचा मीही रक्तदाता म्हणून साक्षीदार होतो. जागतिक योग दिनानिमित्त गतवर्षी असर्जन, नांदेड येथे रामदेव बाबांच्या उपस्थितीत महायोगशिबिर त्यांच्याच नेतृत्वाखाली संपन्न झाले. त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. परंतु याआधीच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा म्हणजेच अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात टक्कर देणारा हाच महाप्रतापी प्रतापराव पाटील हा लोकसभेचा उमेदवार अशोक चव्हाणांना टक्कर देऊ शकतो हे भाजपाने ओळखले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी, विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला होता. भाजपाचा विश्वास सत्यात उतरला आणि बलाढ्य शत्रूला नामोहरम करुन लोकसभेवर त्यांनी आपले नाव कोरले. कोरोनाकाळातही जनतेला धीर देत लोकांचा जनजागृती आणि मदतकार्यात सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते कडाडून बोलतात. आज (२आॅगस्ट) साहेबांचा वाढदिवस परंतु कोरोनाच्या महासंकटामुळे त्यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. परंतु नांदेडच्या गुरुद्वाऱ्यात वाढदिवसानिमित्त भजन होणारच आहे. देशभरासह नांदेड जिल्ह्यातही कोरोणाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे अनेकांचा बळी गेला असून शेकडो जणांना कोरोनाची लागण झाली आहे .अशा परिस्थितीत खासदार साहेबांनीच आपला वाढदिवस आणि वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चाहत्याने वाढदिवस साजरा न करता कोरोनाच्या नियंत्रणासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात मास्क, सॅनिटायझर वाटप करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक भागातील कार्यकर्ते , सर्व पक्षांतील त्यांचे मित्र, साहेबांवर प्रेम करणारे असंख्य चाहते शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. परंतु या वर्षी कोव्हिड- १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता आणि ज्यांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होता यावे, ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त कोणीही हार-तुरे , शाल, पुष्पगुच्छ,भेटवस्तू आणू नयेत तर त्याऐवजी कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे मास्क आणि सॅनिटायझर पुरवठा करावेत, असे त्यांनी सुचविले आहे. तेव्हा या जनतेप्रती संवेदनशील, कणखर आणि लोकप्रिय नेत्याला आता घरीच राहून शुभेच्छा दिल्या जातील!
– गंगाधर ढवळे, नांदेड मो. ९८९०२४७९५३.