#मुंबई_दि.१८ |
कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका/प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण, आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे.
विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार https://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दिलेले निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. प्रवेशाचे निकषासंदर्भात अधिक माहितीसाठी www.doa.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका /प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायांकीत प्रती अपलोड करणे यासाठी 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड याद्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास ६ ऑक्टोबर रोजी सादर करता येतील. ८ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. संबंधित महाविद्यालयात ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत प्रवेश घेता येणार असल्याचे कला संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.