कंधार ; प्रतिनिधी
दि.25/जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार तहसील कार्यालय कंधार येथे निदर्शने करुन निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणूका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदानाचा दर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे असे निवेदन कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार कंधार यांना देण्यात आले .
निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असुन भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणूकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देशातील निवडणूका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि निवडणूकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे.
महाराष्ट्रात नोव्हेंबर-२०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि निवडणूकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते, अवघ्या सहा महिन्यात हे चिञ पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणालाच विश्वास बसणार नाही. मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल ५० लाख मतांची वाढ कशी झाली ? मतदानादिवशी संध्याकाळी ५ वाजता जाहिर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुस-या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये माठी तफावत आहे. यातही ७६ लाख मतदान वाढलेले दाखवत आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमे-यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदारयाद्यातील घोळ, राजीच्या अंधारात वाढलेले ७६ लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही.
राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे. जनतेची ही भावना महत्वाची आहे. आज दिनांक २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे या दिवसाचे औचित्य साधुन काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दापाश करत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणूका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात आली .
यावेळी कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर ,माजी नगरसेवक शहाजी नळगे , माजी उपनगराध्यक्ष हमीदोदिन मोलीसाब,डॉ.राजेश गुट्टे,माजी नगरसेवक डॉ.दिपक बडवणे,बसवेश्वरराव मंगनाळे,माजी नगरसेवक राजेंद्र कांबळे, मगदूम कुरेशी,कॉग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष रमेशसिंह ठाकुर,युवक काँग्रेस शहराध्यक्ष अजय मोरे , माजी नगरसेवक सय्यद सलीम,ॲड.कलिम अन्सारी,तालुका कॉग्रेस सचिव सुरेश कल्लाळीकर,बहाद्दरपुरा सर्कल प्रमुख वसंतराव पाटील घोरबांड,स्वप्निल परोडवाड,गजानन गडमवाड , सुरेश कल्लाळीकर,आदींसह कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .