(फुलवळ ; धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त ज्येष्ठ मुख्य लिपिक गोविंदराव शंकरराव कुलकर्णी व प्रयोगशाळा सहाय्यक महेमुद पठाण यांचा बॅच १९९२- ९३ च्या वर्गमित्र विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला,त्यामुळे उतरत्या वयात आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सन्मानामुळे गुरुजन गहिवरून गेले.
सन्मानाचे औचित्या असे की दि. ४ फेब्रुवारी रोज मंगळवारी “रथसप्तमी” निमित्त सौ. सुरेखा कैलासराव डांगे यांनी आपल्या सर्व १९९२- ९३ च्या वर्ग मित्र – मैत्रीणीसाठी हळदी- कुंकू आणि स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास २४ वर्ग मैत्रिणी पतीसह सहभागी झाल्या होत्या. हळदी – कुंकू आणि स्नेह भोजन निमित्त आपल्याला ज्ञानाचे धडे देणारे आपल्या शाळेतील आणि फुलवळमध्येच स्थायिक असणाऱ्या सेवानिवृत्त ज्येष्ठ गुरुजनांचा सत्कार करावा, ही संकल्पना पुढे आली.आणि ही संकल्पना तातडीने सर्वानुमते मान्य करण्यात येऊन, विजयकुमार सादलापुरे यांनी यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त मुख्य लिपिक गोविंदराव शंकरराव कुलकर्णी व सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक महमूद पठाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे “सत्कारमूर्ती गुरुजन” विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे भारावून गेल्याचे दिसून येत होते..
हळदी – कुंकवाचा कार्यक्रम व सत्काराचा कार्यक्रम संपन्न होताच संध्याकाळी सौ. सुरेखा कैलासराव डांगे यांच्या घरी हळदी कुंकू आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन, स्नेह भोजनाचा आनंद घेतल्यामुळे फुलवळ गावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, अशा कार्यक्रमांची परंपरा भविष्यात कायम ठेवून,आज बिघडत चाललेल्या “नवतरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून व्यसनाधीनते पासून दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, अशीही सर्वसामान्यांमधून अपेक्षा व्यक्त केल्याचे ऐकावयास मिळत होते.

