नांदेड – येथील अतिरिक्त पोलिस अधिक्षक तथा गडप्रेमी सुरज गुरव यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे वैभव असलेल्या ऐतिहासिक व प्राचीन किल्ले सर करून त्यांचा इतिहास जाणून घेवून नांदेड येथील नंदगिरी किल्ल्याच्या 37 किल्लेदारांचा जत्था रविवारी परतला.
येथील अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांनी महाराष्ट्राचे प्राचीन वैभव असलेल्या संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मोहिम हाती घेतली आहे. नांदेडच्या नंदगिरी किल्ल्याच्या देखभालीसाठी सक्षम यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसल्यामुळे तरूणाईमध्ये जनजागृती करून मोठी मोहिम त्यांनी हाती घेतली आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 37 तरूणांची टीम तयार झाली असून गडकिल्लेदार म्हणून ते या मोहिमेत सहभागी झाले आहेत. पोलिस, होमगार्ड यांच्या बरोबरच समाजातील प्रत्येक घटकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धना बरोबरच जनतेसाठी आकर्षक पर्यटन स्थळ निर्माण व्हावे, त्याच बरोबर नवीन पिढीला प्राचीन व ऐतिहासिक वैभव असलेल्या दुर्मिळ वस्तूंचे दर्शन घडावे व त्याची माहिती व्हावी यासाठी शस्त्र प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून नवीन पिढी सुसंस्कारीत घडावी यासाठी सुरज गुरव हे सामाजिक जाणिवेच्या भावनेने प्रयत्नशील आहेत.
नांदेड येथील गडकिल्लेदार यांना महाराष्ट्रातील इतर गडकिल्ल्यांचे दर्शन व्हावे त्याच बरोबर प्राचीन इतिहास समजून घेता यावा यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या पुढाकारामुळे 37 किल्लेदारांना महाराष्ट्रातील गडकिल्ले सर करण्याची संधी मिळाली. सोलापूर येथील भूईकोट किल्ला, पुण्याजवळील दौलतगड व मंदिर, मल्लाहगड, राजगड, सिंहगड येथे किल्लेदारांनी भेटी देवून किल्ले सर केले. तसेच प्राचीन इतिहास जाणून घेतला. चार दिवसांच्या या दौऱ्यामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा व गडकिल्ल्यांचा संपूर्ण इतिहास समजला व आमचे जीवन सार्थक झाले अशी भावना गडकिल्लेदारांनी व्यक्त केली.
या गडकिल्ले दर्शन मोहिमेत प्रसाद पवार, जयेश भरणे, अर्जुन नागेश्वर, प्रदिप टाक, अमोल वागतकर, सागर ढालकरी, ओम कदम, अक्षय डाकोरे, गणेश आकमवाड, सुनिल जाधव, ऋतीक नरडिले, सत्यव्रत सुरावार, साई कदम, गजानन डोके, सचिन तेलंग, आकाश वाघमारे, ओमकार सुरावार, तेजस रोडके, पवन बोंबीलवार, गणेश भैरव, अदित्य नागेश्वर, करण वासमवार, पियुषसिंह चौधरी, नारायण यमुलवार, विनय मनतुरी, शिवाजी शिंदे, साई पाटील उमाटे, गोविंद बोंबीलवार, रोहितसिंग उदगिरवाले, चैतन कांगणे, समर ठाकूर, ऋद्रा लिंगमवार, अजिंक्य उध्दवनकर, राजेश इतबारे, नवीन अण्णा, युवराज मुरकुटे, प्रसाद तेलंग आदी सहभागी झाले होते.