(कंधार ; दिगांबर वाघमारे )
समुद्रात जेंव्हा नाव असते, चोहोबाजूने अचानक पडलेला अंधार, मेघगर्जनेसह होणारा मुसळधार पाऊस व सुसाट वेगाने वाहणारा वारा असतो तेंव्हा ती नाव समुद्रात भरकटत जाते. अशा वेळी एखादा दीपस्तंभच त्या नावेला किनाऱ्यापर्यंत पोंहचवू शकतो. भरकटलेल्या समाजाला सद्मार्गावर आणण्यासाठी तेच काम साधु-संत करीत असतात. म्हणून त्यांचे काम दीपस्तंभासारखे असते, असे गौरोद्गार काढत राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी कंधार तालुक्यातील उमरज तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळवून देण्यासह या संस्थांनचे इतर सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू अशी निःसंदिग्ध ग्वाही त्यांनी यावेळी दिली
कंधार तालुक्यातील संत नामदेव महाराज मठसंस्थांनच्यावतीने आयोजित केलेल्या कलशारोहण, 108 कुंडी विष्णुयाग यज्ञ, अखंड हरीनाम सप्ताह व प.पू. देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या चौथ्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, भाजप नेते एकनाथ पवार, माजी जि.प.सदस्य विजय धोंडगे, चंद्रसेन पाटील, माजी पं.स.सदस्य सुनिल धोंडगे, माजी सभापती बालाजी पांडागळे, प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, भाजपाचे प्रभारी तालुकाध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, माजी पं.स.सदस्य उत्तम चव्हाण, सत्यनारायण मानसपुरे, सोपानराव लोंढे, नागोराव मोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना खा.चव्हाण पुढे म्हणाले की, उमरज येथील विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर पाहिल्यानंतर आयोध्येतील श्रीराम मंदिराची आठवण येते. या मंदिराची उभारणी आणि रचना निश्चितच कौतुकास्तपद आहे. महंत श्री एकनाथ महाराज यांचे काम फार मोठे आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले हे मंदिर केवळ नांदेड जिल्हा नव्हे तर मराठवाड्यासह महाराष्ट्राला भक्तीमार्गावर नेणारे आहे. या मंदिराचा भविष्यात मोठा विकास होणार असून हे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट तीर्थक्षेत्र बनेल यात मला शंका वाटत नाही असेही त्यांनी सांगितले.
उमरज येथील मठसंस्थांनच्यावतीने वेगवेगळी निवेदने प्राप्त झाली. राज्यात व केंद्रात आपले सरकार आहे. हे सरकार धर्माविषयी सकारात्मक भावना ठेवणारे आहे. त्यामुळे जे प्रश्न राज्य पातळीवरचे आहेत ते प्रश्न मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सोडवू व जिल्हा पातळीवरील प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
यावेळी प.पू. देवकीनंदनजी ठाकूर महाराज व उमरजचे मठाधिपती संत श्री एकनाथ महाराज यांच्या हस्ते खा.अशोकराव चव्हाण व डॉ.संतुक हंबर्डे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर भागवत कथेची महाआरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळेस लाखो भविक भक्तांची उपस्थिती होती.