चार दिवसांपूर्वी, सकाळी ऑफिसला जात असताना, मनोली गावातील शाळेतील दोन मुलांनी मला दुर्गामाता डेअरीजवळ लिफ्ट मागितली. प्रवासात सहप्रवाशी असावेत असे मला वाटते.या भावनेतून मी त्यांना गाडीत घेतले. त्या वेळी माझ्या गाडीत ‘छावा’ चित्रपटाचे गाणे सुरू होते. ते ऐकताच त्यांनी विचारले, “हे गाणं ‘छावा’ मधलं आहे ना?” मी त्यांना होकार दिला आणि विचारले, “चित्रपट पाहिलात का?” त्यावर त्यांनी निरागसपणे उत्तर दिले, “नाही, आम्ही कुठे पाहणार? तो तर फक्त थिएटरमध्ये चालू आहे!” हे ऐकून मी थोडा निराश झालो.
बालपणी आपल्या पिढीनेही हेच भोगले होते. शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील मुले-मुलींना सहजगत्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे शक्य होत नसे. शालेय वयात असताना आपणही असेच विचार करत होतो, पण परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. याच विचारातून काही मित्रांसोबत मिळून ठरवले की मनोली गावातच मोठ्या पडद्यावर ‘छावा’ दाखवायचा!
हा उपक्रम कुठल्याही राजकीय हेतूशिवाय होता. त्यामुळे कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारचा सत्कार, गौरव किंवा राजकीय भाषण होणार नाही, यावर आम्ही ठाम राहिलो. हा फक्त आणि फक्त शंभूराजेंच्या विचारांचा जागर करण्याचा सोहळा होता.गावातील शिवचरित्र जागवणारे आदरणीय बंधू बाबासाहेब क्षीरसागर, अभय शिरसाठ आणि पुंजीराम भागवत यांच्या हस्ते महाराजांची आरती करून चित्रपटाची सुरुवात केली. गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि शंभूराजेंच्या जीवनाचा प्रेरणादायी प्रवास अनुभवला. मुलांनी आणि पालकांनी हा चित्रपट मोठ्या उत्साहाने पाहिला, याचा मनस्वी आनंद झाला.
दुर्दैवाने, ज्याप्रमाणे महाराजांना त्यांच्या स्वकियांकडूनच घात सहन करावा लागला, तसाच काहीसा अनुभव आम्हालाही आला. गावातील काही लोकांनी या उपक्रमाला विरोध करायला सुरुवात केली.गावामध्ये चित्रपट का प्रदर्शित केला असा प्रश्न विचारण्यात गेला.माझ्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले, तर काहींनी कुटुंबातील सदस्यांना फोन करून अश्लील भाषा वापरण्याचीही हद्द ओलांडली.पण बोलणाऱ्या तोंडांची संख्या एकच असते, मात्र त्यामागची मस्तके कोणाची आहेत, हे मला चांगले ठाऊक आहे. वेळ आल्यावर त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. पण तोपर्यंत माझ्या कार्याचा मार्ग हा कायम शिवरायांच्या विचारांवरच राहील.
‘छावा’ हा केवळ चित्रपट नाही, तर तो एक चळवळ आहे – शंभूराजेंच्या विचारांची, त्यांच्या बलिदानाची आणि स्वराज्यासाठीच्या त्यागाची. हा विचार जोपर्यंत प्रत्येक मराठा मावळ्याच्या रक्तात वाहतो, तोपर्यंत कोणीही त्याला थांबवू शकत नाही.
जय शंभूराजे! जय शिवराय!
-अभिजीत बेंद्रे
यांच्या fb वरून साभार