मुंबई आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चात सामील व्हा- -सतीश कावडे यांचे आवाहन

 

 

कंधार: प्रतिनिधी

अनु. जाती आरक्षण उपवर्गीकरण विधेयक महाराष्ट्र सरकारने मंजूर करावे, या मागणीसाठी दि. ५ मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे मांगवीर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मातंग व तत्सम वंचित जात समुहाच्या समाज बांधवांनी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल व निर्देशानुसार राज्यातील अनु.जातीतील मागास अशा मातंग व तत्सम वंचित जात समुहाच्या मागणीनुसार अनुसूचित जाती आरक्षणाची पद्धत निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीचा अहवाल घेऊन व महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या सर्व अभ्यास समितीचा शासनाकडे असलेल्या अहवाला आधारे अनु. जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण महाराष्ट्र राज्याने विधेयक मंजूर करावे. हरियाणा, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यांनी अनु. जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण विधेयक पारित करत आरक्षणाचे उपवर्गीकरण मंजूर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल व निर्देशानुसार महाराष्ट्रातही अनु.जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण विधेयक मंजूर करावे आणि सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू करावी. अनु.जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण मंजुरीचा तातडीने कायदा पारित करावा, या मागणीसाठी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, दलित महासंघ, लालसेना आणि समविचारी संघटनेच्या वतीने मुंबई येथे मांगवीर महामोर्चाचे आयोजन ५ मार्च रोजी केले आहे.

त्यात समाजातील बुद्धीवादी, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, समाजबांधवांनी संजय ताकतोडे यांचे बलिदान विचारात घेऊन सर्वांनी महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येने मांगवीर मोर्चात आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहावे. असे आवाहन सतीश कावडे, रामराव सूर्यवंशी, उत्तम बाबळे, इंजि. भाऊसाहेब घोडे, किशनदादा गायकवाड, शिवाजीराव नुरूंदे, एन.डी. रोडे, आकाश सोनटक्के, मालोजी वाघमारे, प्रा. सचिन दाढेल, नागेशभाऊ तादलापूरकर, सुभाष अल्लापूरकर, पत्रकार के. मूर्ती, रामभाऊ देवकांबळे, विश्वांभर बसवंते, डॉ. गंगाधर तोगरे, मच्छिंद्र गवाले, संजय गवलवाड, पंडित देवकांबळे, मनोहर वाघमारे, बालाजी गऊळकर, निलेश मोरे, यादवराव वाघमारे, पी.बी. वाघमारे, यू.एम. भिसे, हनुमंत कंधारे, किरण दाढेल, गणेश गायकवाड, आनंद वंजारे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *