वाटेल तसे रिल्स बनवून सोशल मीडियावर पाठवून आपल्याला सर्वाधिक लोकप्रियता कशी मिळेल यासाठी आजकालच्या वुमनिया कुठल्याही थराला जाण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत..
सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेले इंस्टाग्राम,फेसबुक,व्हाट्सअप किंवा अजून कुठल्याश्या ॲपवर
महिला युजर्स आपल्यात खूप अनोखे टॅलेंट आहे असं भासवून
नाही तसे रिल्स किंवा व्हिडिओ करून ती पोस्ट करण्याची महिलांमध्ये क्रेझ पाहायला मिळते आहे. याचे एकमेव कारण असे की, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण पोस्ट करून स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तासंतास रिल्सवर वेळ खर्च करून घेतात आणि रिल्स मॉनिटाइज्ड झाला तर लाखो रुपयांची कमाई देखील आपण करू असा समज ते बाळगून बसतात.
मात्र इतकं करुनही पदरी तसं काही पडत नाही. या गोष्टी त्यांना समजण्या पलीकडच्या आहेत.
थोडक्यात, महिला काही क्षणातच ट्रेंडमध्ये येण्यासाठी लोकप्रियता वाढवण्यासाठी रिल्सच्या मायवी जाळ्यात गुंतत जात आहेत. परिणामी अशा पद्धतीने प्रसिद्ध होणार्या या काही प्रथम महिला नसून सध्या देशात नमुन्यांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. यात टमरेलमधील, अंगणातील, कुंड्यातील झाडांना पाणी कसं द्यावं ते सकाळी चहाबरोबर खारी, बटर कसं बुडवून खावं, ते साडी कशी नेसावी, ती नेसून कसं बसावं, उठावं, चालावं यावर रिल्स बनवण्यापासून ते पतीदेवाच्या समक्षच भररस्त्यात लेकीबरोबर बीभत्स अश्लील नाच करण्याबरोबरच बेडरूममध्ये काय करावं हे सांगणारे रिल्स, व्हिडीओ बनवण्यापर्यंत या महिलांची मजल गेली आहे. रिल्सच्या नादापायी काहींनी जीवही गमावला आहे, विशेष म्हणजे महिलांच्या या वेड्या चाळ्यांचे चाहतेही मिलियन्स, बिलियन्समध्ये वाढत असल्याने समाजाची सारासार विचारशक्ती किती दळभद्री होत चालली आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. एकीकडे महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात आवाज करायचा आणि दुसरीकडे याच महिलांनी इतक्या चिप पब्लिसिटीसाठी लाज, शरम गुंडाळत बीभत्स अंगविक्षेप करीत रिल्स व्हिडीओ बनवायचे याला काय म्हणायचं?
यामुळे अनेक वेळा आपल्याला प्रश्नही पडतो की या जे काही या रिल्स आणि व्हिडीओमध्ये करीत आहेत ते सगळं जग बघत आहे याचं भान किंवा ज्ञान तरी यांना असेल का? तर यांचं उत्तर हो असंच समोरून येतं. याचा अनुभव मी खुद्द घेतल्याने डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ माझ्यावरच आली. प्रामुख्याने जेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसा कमावता येतो हे आपल्या जनतेला कळू लागलं आहे, तेव्हापासून गल्लोगल्लीत यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्सचे पेव फुटले आहे.
खरंतर देशाला डिजिटल इंडिया करण्यामागचा सरकारचा हेतू अगदी प्रामाणिक होता. सगळं जग डिजिटल होत असल्याने भारतानेही या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काळाच्या बरोबर एक पाऊल पुढे टाकावे यासाठी सगळा खटाटोप करण्यात आला. याचा फायदा तर झालाच लोक डिजिटल शिक्षित तर झालेच पण त्यातून रिल, शॉर्ट्ससारखे नवनवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही निर्माण झाले. काही जण त्याचा योग्य आणि सभ्य वापर करतात. पण सध्या या सोशल मीडियाचा जो गैरवापर महिलांनी सुरू केला आहे तो धक्कादायक आणि संतापजनक आहे. हे सर्व पाहून भारतीय महिलांकडे एवढी फालतूगिरी करायला वेळ कुठून येतो, असा प्रश्न पडतो.कारण जरा नीट सर्च केलंत तर असे दिसून येते सोशल मीडियाचा वापर हा केवळ टुकार मनोरंजन करण्यासाठीच सर्वाधिक केला जातो. काही सेकंदांसाठी तो मेंदू बाजूला ठेवून बघताही येईल, पण त्यातून समाजाला आपण काय देतोय याचाही विचार करायला हवा.
इतर देशातील इन्फ्लुएन्सर आणि आपल्याकडच्या कंटेंट यात एवढा फरक आहे की, ते जगभरात चर्चिले जाऊ शकतात.
पण आपण किती मूर्ख, दर्जाहीन, प्रसिद्धी आणि पैशांसाठी हपापलेलो आहोत, त्यासाठी काहीही वेडे चाळे करण्याची आमची तयारी असते, हाच संदेश या महिला यूट्यूबर्स व्हिडीओतून देत असतात.आजच्या तारखेला जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात मोबाईल वापरणार्यांचा आकडाही अधिक आहे. आपण जे काही व्हिडीओ करीत आहोत त्यातून काय संदेश जातोय याचा विचार करण्याएवढी बुद्धी पण या प्रौढ महिलांमध्ये नक्कीच नसते, पण त्यातून लोकांना आनंद मिळतो आणि आम्हाला पैसा मिळतो एवढा स्पष्ट विचार या महिलांनी केलेला असतो हे पाहता काय बोलावं ते कळतं नाही.
कारण ज्याला कळत नाही त्याला समजावता येतं, पण जो कळूनही वळत नाही त्याला समजावणं म्हणजे ‘गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता’, या म्हणीला साजेशी ही परिस्थिती आहे. या बायकांबद्दल इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ज्यावेळी देशात महिलांवरील अत्याचारावर आवाज उठवला जातो, महागाईवर आंदोलनं केली जातात त्यावेळी या महिला एकही अक्षर त्यावर बोलत नाहीत किंवा त्यावर प्रतिक्रिया देणारे रिल्स करीत नाहीत. अशा वेळी खरंतर बिलियन्स लोकांपर्यंत आपले म्हणणे पोहचवण्याची नामी संधी असते, पण अशा वेळी या महिला त्यांचे टुकार, दर्जाहीन रिल्स बनवण्यात दंग असतात.आज सोशल मीडियावर या महिलांचे राज्य असून त्यांचा चाहताही पुरुषवर्गच आहे. हीदेखील कमाल आहे. येडं बनून पेडगावला जाण्याचे उद्योग रिल्सच्या माध्यमातून करणार्या या महिला जगाचे सोडा आपल्या मुलांपुढे तरी काय आदर्श निर्माण करीत आहेत याचीही त्यांना पर्वा राहिलेली नाही.
सोशल मीडिया व्ह्यूज, प्रसिद्धी, पैसा हेच खरं आयुष्य असं समजणार्या या महिलांना वेळीच आवरणं गरजेचं आहे, अन्यथा येत्या काळात अनेक धक्कादायक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल, ज्यातून देशाचे नाव झळाळून तर नक्कीच दिसणार नाही, उलट या चिमूटभर महिलांमुळे जगभरात इतर भारतीय महिलांवर लाजेने मान खाली घालण्याची नामुष्की मात्र नक्की येईल. तो दिवसही फार दूर नसेल मग…., त्यामुळे
रिल्सच्या मायावी गुंत्यात हरवलेल्या ‘वुमनियानी’ त्यातून वेळीच बाहेर पडणे गरजेचे आहे.
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

