*ऐन तारूण्यात विष प्रयोगामुळे दोन्ही पाय विकलांग झाले. आकस्मिक आलेल्या अपंगत्वामुळे संपूर्ण जीवन अंधकारमय झाले. न्यायासाठी दारोमाळ भटकत असताना भुकेमुळे जीव व्याकुळ होत असताना पैसे नसल्यामुळे दिवसाला एक वडापाव कसाबसा पोटात घालायचा. अशा विदारक परिस्थितीत जीवन जगत असताना अफाट मेहनत, चिवट जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वास या त्रिसुत्रीच्या बळावर संघर्षकन्या, आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिने पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात मानाचे स्थान मिळविले. नांदेड जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राचा सर्वत्र डंका वाजविणार्या भाग्यश्री हिचा जीवनप्रवास म्हणजे एका चित्रपटाचे कथानक आहे.*
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज या डोंगराळ, दुष्काळी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात भाग्यश्री जाधव हिचा जन्म झाला. घरी अवघी चार एकर शेती. जाधव परिवारात तीन पिढ्यानंतर हे जन्मलेले कन्यारत्न असल्यामुळे आनंदाला उधान आले. वडील माधवराव जाधव मानसिकदृष्ट्या विकलांग असल्यामुळे चुलते आनंदराव जाधव यांनी तिच्या पालनपोषणासह कुटुंबाच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी तिचे शुभमंगल पार पडले. विवाहानंतर साधारणपणे तीन वर्षातच तिचे सुख हरवले. 2006 साली झालेल्या विष प्रयोगाच्या घटनेनंतर ती तब्बल 13 दिवस कोमात गेली होती. ती आता जगेल असे कुणालाच वाटत नव्हते. धनधाकट लेक मरणाच्या दारात उभी असल्यामुळे जाधव परिवार हादरून गेला होता, हतबल झाला होता. डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते आणि देवाचा धावा सुरू होता. त्यातच चमत्कार घडला. मृत्यूला हरवून भाग्यश्री जिंकली. पण दुर्दैव असे की, तिचे दोन्ही पाय कमरेपासून विकलांग झाले. ऐन तारूण्यात आकस्मिकरित्या अपंगत्व आले आणि तिचे जीवन अंधाराच्या गडद छायेत गेले. आता जगावे कसे ? असा भयावह प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला. लेक वाचली याचा आनंद जाधव परिवाराला होता, पण तिला आलेल्या कायम अपंगत्वाचे शल्य मात्र त्यांच्या मनात बोचत होते. पण अशाही बिकट परिस्थितीत त्यांनी तिला मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. अपंगत्वामुळे तिला चालता येत नव्हते, तिला पाठीवर घेऊन किंवा दोन्ही हातात (लहान मुलाला घ्यावे तसे) लागत असे. तिने डी.एड्.साठी अहमदपूर येथे प्रवेश घेतला. चुलते आनंदराव जाधव, काकू आशाबाई जाधव, चुलतभाऊ गणेश जाधव, लहान भाऊ रमेश जाधव व इतर नातलगांच्या मदतीने ती शिक्षण घेत होती. कुटुंबवत्सल असलेले चुलते आनंदराव जाधव यांना भाग्यश्रीवर झालेला हा आघात सहन झाला नाही. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भाग्यश्रीवर आभाळ कोसळले. आपला पालनकर्ताच गेल्यामुळे ती पार खचून गेली.
डी.एड.चे शिक्षण तिला अर्ध्यावर सोडून द्यावे लागले. हिरवळीसारखे तिचे जीवन अचानक वाळवंट झाले. अपंग आणि पुन्हा परितक्ता या दोन्ही शस्त्रांनी ती घायाळ झाली होती, पण आयुष्याची जंग आता नेटाने लढण्याचा तिने निर्धार केला. कुटुंबावर ओझे म्हणून जगण्याऐवजी आत्मनिर्भर होऊन संघर्ष करण्याचा संकल्प तिने केला. होनवडज हे गाव सोडून तिने नांदेडला मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. बी.ए.चे शिक्षण घेत न्याय मिळविण्यासाठी ती दारोदार फिरत होती. पोलीस स्टेशन, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या घरचे उंबरठे झिजवित होती. आर्थिक अडचणीमुळे एक वेळा कधी चणेफुटाने, कधी वडापाव खायचा आणि एक वेळा मेसमध्ये जेवण करायचे. तिचा हा संघर्ष सुरू असताना तिला ज्येष्ठ पत्रकार तथा होमगार्डचे तालुका समादेशक प्रकाश कांबळे यांची भावाच्या रूपाने भक्कम साथ मिळाली. त्यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे तिच्या जीवनाच्या वेगळ्या प्रवासास सुरुवात झाली. संघर्षाच्या या लढाईत तिला स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्याचा सल्ला पत्रकार प्रकाश कांबळे यांनी दिला. पायांच्या उपचारासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे हे प्रयत्न सुरू असतानाच नाकामध्ये मोठी गाठ तयार झाली. तिचा श्वास कोंबल्या जाऊ लागला. दुर्दैवाचा वेगळाच फेरा सुरू झाला. अनेक निष्णात डॉक्टर गाठले. ऑपरेशन करून गाठ काढण्याशिवाय पर्याय नव्हता. हे ऑपरेशनदेखील खूपच रिस्की होते. तसेच चेहर्यावर नंतर प्लॅस्टिक सर्जरीदेखील करावी लागेल, असे सांगितल्या जात होते. मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मोठी जोखीम पत्करून हे ऑपरेशन केले. भाग्यश्री आता जिवंत येणार नाही, असे म्हणत काहीजण देव पाण्यात सोडून बसले होते. पण इथेदेखील या वाघीणीने मृत्यूला चारीमुंड्या चित्त केले.
मुक्त विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादन करत असताना शिक्षणासह स्वतःचा इतर खर्च भागविण्यासाठी तिने घरोघरी जाऊन साड्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील तिने सुरू केली. अधिकारी होण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. पायांमध्ये बळ यावे, यासाठी ती दररोज वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम नित्यनेम करीत होती. याच दरम्यान दिव्यांगांच्या वेगवेगळ्या क्रिडास्पर्धा होतात, याची माहिती तिचे गुरु बंधु पत्रकार प्रकाश कांबळे यांना समजली. मग त्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्याचा निश्चय केला. नांदेड होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील कवायत मैदानावर तिने सर्वप्रथम सराव करायला सुरूवात केली. प्रकाश कांबळे यांनी तिचा सराव घेण्यासाठी होमनार्ड मधील एका मानसेवी अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविली. व तिच्या सरावास सुरुवात झाली.पुणे येथे 2017 साली झालेल्या महापौर चषक क्रीडास्पर्धेत गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात तिने सुवर्ण पदके पटकावली आणि थाळीफेकमध्ये कास्यपदक मिळविले. पहिल्या स्पर्धेत हे नेत्रदीपक यश मिळवून तिने सबंध महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधले. 2018 साली कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत गोळाफेकमध्ये तिने सुवर्णपदकाची कमाई केली.
हा क्रीडा प्रवास सुरू असतानाच शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता एम.ए. पूर्ण केले आणि बी.एड.साठी प्रवेश घेतला. एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे सराव सुरू होता. क्रीडाक्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ प्रशिक्षक, मार्गदर्शक नसतानादेखील सहकार्याची भूमिका असणार्या हितचिंतकांच्या सल्ल्याने सराव सुरू होता. स्पर्धा, सराव, डायट याचा नियमित खर्च करणे अशक्य होत होते, पण यात खंड पडू देता येत नव्हता. त्यामुळे उसनवारी व्याजाने पैसे घेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. याचमार्गाने तिचा प्रवास सुरू होता. 2018 साली पंचकुला चंदीगड येथे झालेल्या क्रीडास्पर्धेत भाग्यश्रीने गोळाफेकमध्ये कास्यपदक पटकावले आणि ती आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेच्या तयारीचा विचार करू लागली. आता मात्र तिचा प्रवास खूप खडतर होता. पुणे येथे राहून सराव करण्याचा निर्णय तिने घेतला. 2019 मध्ये चीन येथे पॅरा ओपन चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली. परंतु जाण्याऐण्यासाठी पैसे नव्हते. पैशाची जुळवाजुळव सुरू झाली. भाऊ गणेश जाधव व इतरांनी मदत केली, परंतु रक्कम जुळत नव्हती. शेवटी आईचे मंगळसूत्र व दागिने गहाण ठेवावे लागले. त्यानंतर ती चीनमध्ये स्पर्धेसाठी गेली. या स्पर्धेत गोळाफेक आणि भालाफेक या क्रीडाप्रकारात कास्यपदक पटकावून भारताचा झेंडा तिने डौलाने फडकविला. देशभरात तिचे कौतुक झाले. ऑलिम्पिक, एशियन स्पर्धेत सहभागी होण्याचे तिचे स्वप्न होते. स्पर्धेच्या तयारीचा तिचा प्रतिमाह खर्च 50 हजार रूपये होता. सगळेच सोंग करता येते, पण पैशाचे सोंग करता येत नाही. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी तिला आर्थिक मदत करून तिच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न केला. लॉक डाऊनमुळे पुणे सोडून पुन्हा नांदेड येथे येण्याचा निर्णय व्यथित अंतःकरणाने तीने घेतला.
कोरोना विषाणूमुळे अख्खे जग हैराण झाले. देशभरात कडक लॉकडाऊन सुरू झाले. पण या लॉकडाऊनच्या काळातसुद्धा भाग्यश्री जिद्दीने सरावासाठी मैदानात उतरली. नांदेड येथील पोलीस मुख्यालयाच्या जुन्या कवायत मैदानावर तिचा नियमित सराव सुरू होता. आई पुष्पाबाई हिची सोबत सदैव सावलीसारखी होतीच. दररोज मैदानात आल्यावर आईने ती खुर्ची घणाने ठोकून फिट्ट बसवायची. खुर्ची दररोज ठोकून बसवून व काढून त्या माऊलीच्या हाताला अक्षरशः घट्टे पडले आहेत. इतकेच नाही तर सरावादरम्यान भाग्यश्रीने फेकलेला गोळा तिला आणून देण्याचे कामदेखील आईच करायची. लेकीच्या जिद्दीला, मेहनतीला आईची सदैव साथ होती. 2020 मध्ये बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत गोळाफेकमध्ये भाग्यश्री नंबरवन ठरली. सराव सुरू असताना भाग्यश्रीच्या खांद्याला दुखापत झाली. प्रचंड वेदना होत होत्या. प्रसिद्ध आर्थो सर्जन डॉ. राजेश आंबुलगेकर, पुण्यातील निष्णात आर्थो सर्जन डॉ. आशिष बाभुळकर यांनी तिच्यावर उपचार केले. त्यांनी विश्रांतीबरोबरच स्पर्धेत सहभागी न होण्याचा सल्ला दिला. लिगामेंट इंज्युरी असल्यामुळे भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे खेळापासून काहीकाळ दूर राहिलेले बरे राहील, असे सांगितले. पण संकटाला घाबरेल ती भाग्यश्री कसली. तिने काहीही झाले तरी चालेल पण मी मैदान आणि स्पर्धा सोडणार नाही. तुम्ही फक्त उपचार करा असे डॉक्टरांना सांगितले. या डॉक्टर महोदयांनी तिच्या जिद्दीचे कौतुक करत उपचार सुरूच ठेवले आणि आजही सुरूच आहेत. पायाची नस दबलेली असल्यामुळे नांदेडच्या प्रसिद्ध डॉक्टर शुभांगी पाटील यांनी सतत फिजीओथेरपीचे उपचार त्यांनी केले, व आजही त्या करतात.
2021 मध्ये दुबई येथे फाजाकप स्पर्धेसाठी तिची निवड झाली. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला पुन्हा एकदा मिळाली. या संधीचे देखील तिने सोने केले. गोळाफेकमध्ये सिल्व्हर मेडल तर भालाफेकमध्ये ब्रांझ मेडलवर तिने आपले नाव कोरले. जून 2021 मध्ये नवी दिल्ली येथे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड चाचणी झाली. त्या स्पर्धेत भाग्यश्रीने पुन्हा चमकदार कामगिरी करत अवघ्या देशाचे लक्ष वेधले. भारतीय संघातील चार महिला खेळाडूंमध्ये तिचा समावेश झाला. टोकिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिंक स्पर्धेत ती सहभागी झाली. या स्पर्धेत जगात सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली. पोर्तुगाल व मोरॅक्को येथे झालेल्या जागतिक पातळीवर स्पर्धेत देखील तिने पदकांवर आपले व भारताचे नाव कोरले. सन 2019 पासून आज पर्यंत झालेल्या जागतिक स्तरावरील दिव्यांग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे. मराठी बाणा तिने देशभर गाजविला.आज देशपातळीवर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिचा हा क्रीडा प्रवास थक्क आणि अचंबित करणारा आहे. लहरोंसे डरकर नौका पार नही होती, कोशिश करनेवालोंकी हार नही होती. या जिद्दीने तिने हा यशाचा पल्ला गाठला आहे. तिचे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी 2023 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तीने रौप्य पदक पटकावले. 2024 मध्ये जपान येथ झालेल्या पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावले. पॅरालिंम्पिक स्पर्धेत तिच्या सहभागीचा मार्ग मोकळा झाला. सन 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय संघाच्या ध्वजवाहकाचा सन्मान देखील तिला मिळाला. दुर्दैवाने तिला पदकापासून दूर राहावे लागले. पण ती अजूनही खचली नाही. आगामी काळात आशियाई स्पर्धा, पॅरालिंम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्याची तिची जिद्द उराशी बाळगून ती जीवापाड मेहनत करत सराव करत आहे.
महाराष्ट्र शासनाने तिच्या कार्याची दखल घेऊन शिवछत्रपती पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. तसेच वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, वृत्त वाहिन्या यांनी भाग्यश्री जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. महाराष्ट्र शासनाने तिची क्रिडा क्षेत्रातील उतूंग भरारीची दखल घेत मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी- वर्ग एक पदावर निवड केली आहे. नांदेडची भूमीकन्या महाराष्ट्राच्या या लेकीच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा…….!

