कंधार प्रतिनीधी –
अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे. वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे.
संगमवाडी येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह ४ मार्च ते ११ मार्च दरम्यान सप्ताह साजरा झाला. विशेष म्हणजे या सप्ताहास ४६ वर्षांची अखंड परंपरा आहे.
अखंड हरिनाम सप्ताह संगमवाडी येथे ४ मार्चला किर्तनकार ह.भ.प.श्री भागवत महाराज महाळंगीकर , ५ मार्च ह.भ.प.श्री बंडा महाराज आलगरवाडीकर, ६ मार्च ह.भ.प.श्री पंढरीनाथ म. नांदेडकर , ७ मार्च ह.भ.प.श्री सतीश म. पंढरपुरकर, ८ मार्च ह.भ.प.श्री काशिनाथ म. नगरवाडीकर, ९ मार्चला ह.भ.प.श्री प्रसाद म. गडदे आळंदीकर , १० मार्च ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर म. पवार पंढरपुरकर व ११ मार्चला काल्याचे कीर्तन ह.भ.प.श्री प्रभाकर म. झोलकर (नाना) यांचे झाले . यांच्या रसाळ वाणीतून भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले.
सप्ताह काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत कीर्तनकारांकडून समाजप्रबोधन करण्यात आले. कीर्तनातून आईवडिलांचा सांभाळ करावा, असे आवाहन केले. आईवडिलांची सेवा हाच धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.
भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या लीलांचे वर्णन त्याचप्रमाणे अवतार संपेपर्यंत जीवनप्रवासावर प्रबोधन केले. दहीहंडीच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता झाली .
भागवताचार्य श्री.ह.भ.प. माधव महाराज केंद्रे माळाकोळीकर यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेत श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे वर्णन करण्यात आले आहे. त्यांना संगितसाथ -संगित विशारद गोपीनाथ गुरुजी केंद्रे,सिंध वादक – वासुदेव महाराज महालंगीकर,मृदंग सेवक सत्यम महाराज केंद्रे यांची साथ होती .
अखंड हरिनाम सप्ताहात परिसर भक्तिमय वातावरण होते. सप्ताहानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल्याचे कीर्तन झाल्या नंतर महाप्रसादाचा आस्वाद हजारो भाविक भक्तांनी घेतला .

