नूतन मंडल अध्यक्षांचा सत्कार; प्राधिकरणाला भाजपाचा विरोध
नांदेड – भारतीय जनता पक्षात अंत्योदय ही मुळ संकल्पना आहे. अंत्योदयाची परिपूर्ती करायची असेल तर कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करणे गरजेचे आहे. पक्ष संघटना व कार्यकर्ता यामध्ये मंडल अध्यक्ष यांचे स्थान अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे यांनी केले.
भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या पुढाकारातून नव्यानेच निवडूण आलेल्या जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांचा सत्कार सोहळा येथील कुसूम सभागृहात 1 मे रोजी आयोजित केला होता. तेंव्हा ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, खा.डॉ.अजित गोपछडे, मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, आ.भीमराव केराम, आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण, आ.जितेश अंतापूरकर, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, माजी महापौर मंगलाताई निमकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी महानगराध्यक्ष प्रविण साले, चैतन्यबापू देशमुख बाळू खोमणे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या राठोड, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, रामराव नाईक, प्रा.नंदू कुलकर्णी, प्रवक्ते संतोष पांडागळे, डॉ.शितल भालके, महादेवी मठपती, कविता कळसकर, अनिता हिंगोले, सुमती व्याहाळकर, उमेश चव्हाण, मोहनसिंग तौर, दिलीपसिंघ सोडी, रामराव केंद्रे, विनायक सगर, सदाशिव पुरी, प्रविण गायकवाड, दत्ता कोकाटे, बागड्या यादव, राजू गोरे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पालकमंत्री सावे म्हणाले की, माझ्या राजकीय जिवनाची सुरुवात मंडल अध्यक्षांपासून झाली आहे. त्यानंतर मी आमदार आणि अनेक वर्षांपासून मंत्री म्हणून काम करीत आहे. त्यामुळे मंडल अध्यक्ष या पदाला कमी लेखू नका. मंडल अध्यक्षांना भाजपाच्या संघटनपर्वामध्ये मोठे महत्व आहे. आपण स्वतःला पक्ष संघटनेत झोकून देवून काम करा. आपल्या कामाचा विचार नक्की होईल असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. या पक्षात सातत्यपूर्ण काम करीत राहणे गरजेचे आहे. पक्षातील कुठलेही पद हे मिरविण्यासाठी नाही तर लोकांचे काम करण्यासाठी आहे. सातत्यपूर्ण नियोजनबध्द काम करीत राहणे ही जशी भारतीय जनता पक्षाची पध्दत आहे. तशीच माझीसुध्दा पध्दत आहे. काँग्रेस पक्षामध्ये असतांना याच पध्दतीने आपण करीत होतो. पुढेही आता असेच काम करीत राहु. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या व्यासपिठावर बसलेल्या नेत्यांसाठीच्या नव्हेत तर तुम्हा कार्यकर्त्यांच्या असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आपली ताकद अधिक वाढविण्यासाठी आणि जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपालिका, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी आपण कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलतांना खा.डॉ.अजित गोपछडे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपाचे काम अतिशय उत्कृष्ट चालू आहे. संघटनपर्वा अंतर्गत नवीन मंडल अध्यक्षांच्या निवडी करतांना सर्वांची मते जाणून घेतली. कुठलाही वादविवाद न होता ही निवड प्रक्रिया पार पडली. भविष्यात पक्षाला अधिक ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी झोकून काम करण्याची गरज आहे.
यावेळी बोलतांना विभागिय संघटन मंत्री संजय कौडगे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये विक्रमी सभासद नोंदणी झाली आहे. पक्षाचे संघटनपर्व आता अंतिम टप्यात आले आहे. लवकरच जिल्हाध्यक्षांच्या निवडी होतील. त्यानंतर आपण सर्वांनी पक्ष संघटना वाढीसाठी झटून कामाला लागले पाहिजे. पक्षाची शिस्त कायम ठेवली पाहिजे.
भाजपचा प्राधिकरणाला विरोध – माजी आ.राजूरकर
कार्यक्रमाचे संयोजक व भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकेच्या भाषणातून पक्ष संघटनेच्या मजबुतीकडे लक्ष वेधतांनाच नांदेड शहरासाठी प्राधिकरण आणण्याचा आमच्या कांही मित्रपक्षातील नेत्यांनी घाट घातला आहे. परंतु यास भाजपचा विरोध असणार आहे. भविष्यात महापालिकेची सीमावाढ करून पासदगाव व जवळची खेडी महापालिकेत घ्यावीत व यासोबतच शेजारच्या वाडी बु.ग्रामपंचायतचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे असे सांगतांनाच नांदेड शहराच्या विकासाला बाधा आणणारे प्राधिकरण आम्ही होऊ देणार नाही असे राजूरकर यांनी ठणकावून सांगितले. यावेळी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांचेही समयोचित भाषण झाले. या सत्कार सोहळ्यास जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.त्यानंतर पालकमंत्री अतुल सावे ,माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.त्यावेळी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

