कृषि विभाग व पाणी फाऊंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन

नांदेड, दि. 14 मे :- पानी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रामध्ये कृषी वि‌द्यापीठाच्या सहकार्याने डिजिटल शेतीशाळा राबवित असते. सदर डिजिटल शेतीशाळेचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे पानी फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमातून व शेतकऱ्यांच्या अनुभवातून दिसून येत आहे. कृषि विभाग व पानी फाउंडेशन यांचेमार्फत सन 2025-26 करिता डिजिटल शेतीशाळा राबविणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. या डिजिटल शेतीशाळेचे माहे मे 2025 चे वेळापत्रक प्राप्त झाले आहे.

गुरुवार 15 मे 2025 पासून शेतीशाळा सुरु होत आहेत. 15 मे रोजी आंबा व पेरू, 19 मे रोजी बाजरी व सोयाबीन, 20 मे खरीप ज्वारी व कापुस, 21 मे भात, मका व पशुधन, 22 मे घेवडा (राजमा) व संत्रा, मोसंबी तसेच कागदी लिंबू, 23 मे तुर, मुग व उडीद 24 मे रोजी भाजीपाला या पिकांच्या शेतीशाळाचे आयोजन प्रत्येक गावामध्ये ऑनलाईन करण्यात आले आहे. डिजिटल शेतीशाळा पाहण्यासाठी संगणक, लॅपटॉप, मोबाईल, प्रोजेक्टर इ. साधनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या डिजिटल शेतीशाळासाठी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, कृषिताई, ग्राम कृषि विकास समिती यांचे सदस्य,स्वयंसेवक यांची उपस्थिती राहणार आहे.

अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या तांत्रिक शंकांचे निरसन करणार आहेत. डिजिटल शेतीशाळेसाठी शेतकऱ्यांना स्वतः झुम लिंकवर किंवा पानी फाउंडेशन युटयुब चॅनलवर लाईव्ह कार्यक्रमास जॉईन होता येईल. शेतकऱ्यांना येणाऱ्या शंका झुमच्या चॉट बॉक्स किंवा युटयुबच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहावे. या डिजिटल शेतीशाळेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा आधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *